हिंगोली जिल्ह्यात नागरिकांच्या व व्यापाऱ्यांच्या बिनधास्तपणामुळेच कोरोनाचा कहर वाढत गेला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या आवाक्याच्या बाहेर जाण्याची चिन्हे निर्माण झाली तरीही जिल्ह्यात व्यापाऱ्यांना शिथिलता देण्याची मागणी केली जात होती. अनेकांचे हातावरचे पोट असल्याने अशा किरकोळ विक्रेत्यांना पुढे करून मोठे व्यापारीच यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र आता दिवसाआड का होईना व्यापारासाठी मुभा मिळाली तर नियमांचे तीनतेरा वाजत असल्याचे कुणालाही काही सोयरसूतक दिसत नाही. बाजारपेठेत आज गर्दीचा उच्चांक पहायला मिळाला. शिवाय कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने घालून दिलेले नियमही कुणी? पाळायला तयार नाही. ग्राहकही त्यासाठी जागरुक नाही आणि व्यापाऱ्यांना तर व्यापार करण्याच्या पलिकडे काही सुचत नसल्याचे दिसत आहे. सर्वात आधी मास्कबाबत साधी विचारणाही कोणी करीत नाही. अनेक व्यापाऱ्यांच्याच तोंडावरील मास्क आता हनुवटीपर्यंत खाली उतरल्याचे दिसत होते. ग्राहकांपैकी तर ४० टक्के लोकांना मास्कच नसल्याचे दिसून येत होते. याशिवाय सामाजिक अंतराचा नियमही असाच पायदळी तुडवला जात आहे. सामाजिक अंतरासाठीची वर्तुळे असूनही काही ठिकाणी वापर होत नव्हता. जेथे अशी वर्तुळेच आखली नाही, त्यांना तर बोलायचे कुणी? हा प्रश्न आहे. त्याचबरोबर दुकानातील कर्मचाऱ्यांसाठी अथवा स्वत:साठीच अनेकांनी हात धुण्यासाठी अथवा सॅनिटायझेशन करण्यासाठी व्यवस्था केली नाही. तेथे ग्राहकांची दैना न विचारलेलीच बरी.
आज किराणा दुकानापासून ते इतर सर्वच ठिकाणी तुफान गर्दी दिसत होती. भाजी मंडईही विखुरलेली असताना पाय ठेवायला जागा नव्हती. अनेकांनी इतरत्र असलेली दुकाने पुन्हा भाजीमंडईत आणल्याचे चित्र आहे. एक दिवसाआड व्यापाराला मुभा असली तरीही काहींचे गाडे बंदच्या दिवशीही गल्लोगल्ली फिरत असल्याने मुभा दिलेल्या दिवशी मंडईतच दुकान लावण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे. रुग्णसंख्या घटल्याने सध्या प्रशासनही थोडे संथ झाले आहे. एवढे दिवस दंडाच्या पावत्या फाडत फिरणारी पथकेही आज कुठेच दिसत नव्हती. त्याचाही फायदा उचलला जात आहे. यामुळे पुन्हा संक्रमण वाढले तर आपल्याच व्यापाराची ऐसी तैसी होणार असल्याचे भानही उरले नाही.
ग्रामीण भागाला मास्कचे वावडे
शहरी भागातील तरी ९० टक्के लोकांकडे मास्क दिसून येतो. मात्र ग्रामीण भागातून येणाऱ्या ५० टक्के जणांकडेही मास्क दिसत नाही. त्यातच ग्रामीण भागातूनही खरेदीसाठी येणाऱ्यांचे मोठे प्रमाण दिसून येते. त्यामुळे शहरी भागातीलही अनेकजण मास्ककडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. तर दंड लावल्यास गयावया केली जाते. मात्र त्याच्या २० टक्के रक्कमेत येणारा मास्क खरेदी केला जात नाही.
नियम तोडला की चाचणी व्हावी
ज्या दिवशी बाजारपेठेला मुभा दिली त्या दिवशीही नियमांचे पालन न करणाऱ्यांसाठी फिरते आरोग्य पथक लावून अशांच्या चाचण्या केल्यास नियमांचे पालन करण्याची सवय लागू शकते. कोरोनाचा कहर कमी झाला म्हणून आलेला बिनधास्तपणा तिसऱ्या लाटेकडे नेणारा ठरू शकतो.