भारत यात्रींचा एकमेकांना ‘खो’; मैदानी खेळांचा लुटला आनंद
By शिवराज बिचेवार | Published: November 14, 2022 12:06 PM2022-11-14T12:06:20+5:302022-11-14T12:07:07+5:30
Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यात सहाव्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे रविवारी वाटचालीला विश्रांती देत भारत यात्रींनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अस्सल मैदानी खेळांचा आनंद लुटला.
- शिवराज बिचेवार
हिंगोली : काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यात सहाव्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे रविवारी वाटचालीला विश्रांती देत भारत यात्रींनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अस्सल मैदानी खेळांचा आनंद लुटला. त्यात कुणी एकमेकांना खो दिला तर कुणी दांडूने विटी उंच आकाशात भिरकाविली.
भारत यात्रींची व्यवस्था हिंगोली शहरातील तिरुमला लॉन्स या ठिकाणी करण्यात आली आहे. रविवारी यात्रेच्या विश्रांतीचा दिवस असल्याने सर्वच जण रिलॅक्स मूडमध्ये होते. रविवारी अनेकांनी उशिरापर्यंत अंथरुण सोडले नव्हते. तर काही जण झोपेचा बॅकलॉग भरून काढत होते. सकाळी चहा आणि नाश्ता झाल्यानंतर भारत यात्रींनी आपल्यासोबत आणलेल्या कपड्यांची धुलाई केली.
यात्रा विश्रांतीच्या दिवशी भारत यात्रींसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात येते. त्यात रविवारी खास महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील मैदानी खेळ असलेला विटी-दांडू मागविला होता. तसेच काही गट हे खो-खो या खेळाचा आनंद घेत होते. अधिक वय असलेले भारत यात्री वेगवेगळी पुस्तके वाचण्यात दंग होते तर काही जण विविध विषयांवर चर्चा करीत होते.