हिंगोली : चालकाचे टँकर वाहनावरील नियंत्रण सुटून महामार्गाच्या बाजूला जावून उलटल्याची घटना तालुक्यातील वडद पाटी परिसरात २३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. टँकरमध्ये डिझेल असल्याचे समजून काही ग्रामस्थ बादल्या, कॅन घेऊन आले होते. मात्र यात इंडस्ट्रीयल ऑईल निघाल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
विशाखापटनम येथून हिंगोली-कनेरगाव मार्गे राजकोटकडे एका टँकरमधून इंडस्ट्रीयल ऑईल नेले जात होते. हा टँकर बुधवारी सकाळी हिंगोली तालुक्यातील वदड पाटी परिसरात आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून टॅंकर महामार्गाच्या बाजूला जाऊन उलटला. यात चालक नागाराम जाट (रा. बाडमेर, राजस्थान) हे किरकोळ जखमी झाले. त्यांना काही ग्रामस्थांनी उपचारासाठी दवाखान्यात हलविले. यावेळी वडद पाटीजवळ डिझेलचा टँकर उलटल्याची माहिती परिसरात पसरली. त्यामुळे काही जणांनी प्लास्टीक बादल्या, कॅन, बकेट आदी घेऊन घटनास्थळाकडे धाव घेतली. काही वेळातच टँकर मधून डिझेल काढण्यासाठी गर्दी झाली.
काही महाभागांनी तर चक्क टँकरवर चढून डिझेल काढण्याचा प्रयत्न केला. मात्र टँकरच्या झाकणातून पाहणी केली असता आतमध्ये डिझेल ऐवजी इंडस्ट्रीयल ऑईल असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ग्रामस्थांचा चांगलाच हिरमोड झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीणचे पोलिस उप निरीक्षक अशोक कांबळे, सहायक फौजदार संतोष वाठोरे, पोलिस अंमलदार अनिल डुकरे, शरद नागूलकर, गजानन दांडेकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आल्याचे पाहताच तेथे जमलेल्या ग्रामस्थांनी काढता पाय घेतला. क्रेनच्या सहाय्याने टँकर महामार्गावर आणले जात होते. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात दुपारपर्यंत नोंद झाली नव्हती.