हिंगोली : राज्यात सांगलीनंतर हळदीसाठी दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या हिंगोलीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डात ११ मे रोजी तब्बल ९ हजार क्विंटलची आवक झाली. मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी आणल्याने आवक वाढली. त्यामुळे मार्केट यार्ड आवारात वाहनांच्या रांगा लागल्या असून, मोजमापसाठी तीन दिवस लागणार असल्याचे बाजार समितीने सांगितले.
येथील संत नामदेव हळद मार्केट यार्ड खरेदीदार आणि बाजार समिती यांच्यातील समन्वयाअभावी पाच दिवस बंद होते. ९ मे रोजी झालेल्या बैठकीत हळद मार्केट यार्ड पूर्ववत सुरू करण्याचे ठरले होते. त्यानुसार ११ मेपासून मार्केट यार्डातील हळद खरेदी- विक्रीचे व्यवहार सुरळीत झाले. पाच दिवसांच्या बंदमुळे आवक वाढली. १० मेपासूनच हळद मार्केट यार्डात वाहने दाखल होत होते. तर रात्रीही मोठ्या प्रमाणात हळद विक्रीला आल्याने मार्केट यार्ड आवारात वाहनांची गर्दी झाली होती. तर आवाराबाहेरील रस्त्यावर सुमारे अर्धा किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या.
हिंगोलीसह परभणी, नांदेड तसेच विदर्भातील यवतमाळ, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही या ठिकाणी हळद विक्रीसाठी आणली. मार्केट यार्डात सरासरी ४ हजार क्विंटलची आवक होते. मात्र, पाच दिवसांच्या बंदनंतर मार्केट यार्ड सुरू झाल्याने ९ हजार क्विंटलची आवक झाली. ५ हजार २०० ते ६ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
हळद उत्पादकांच्या पदरी निराशा...वसमत येथील मोंढ्यात दोन दिवसांपुर्वी हळदीला ९ हजार ९० रूपये प्रतिक्विंटलने भाव मिळाला. त्यानुसार हिंगोलीच्या मार्केट यार्डात हळदीला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, ५ हजार २०० ते ६ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटलने हळद विक्री झाली. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत होती.