लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आजही अनेक निरागस बालके त्यांच्या हक्कापासून वंचित आहेत. तर काहींचे बालपनच पालावर हरवत चालल्याने या चिमुकल्यांना शिक्षणाचा गंधही नाही. त्यामुळे बालदिन साजरा करावा की नाही? हा प्रश्नच आहे.दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस देशभर बालदिन म्हणून मोठ्या थाटात साजरा केला जातो. बालकांचे हक्क, त्यांचे अधिकार त्यांना खरंच मिळतात का? हा मात्र मोठा प्रश्न आहे. त्यातच पालावर राहून पोटाची खळगी भरणाऱ्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न तर गंभीर आहेच शिवाय आरोग्यही धोक्यात सापडत चालले आहे. जिल्ह्यात आजही शेकडो बालके शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित आहेत. या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून उपाय-योजना सुरू असल्या तरी प्रत्येक्षात मात्र योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. शिक्षण विभागातर्फे सध्या जिल्ह्यात बालरक्षकामार्फत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जि. प. प्रशासन व शिक्षणाधिकाºयांनी याबाबत नुकत्याच संबधित यंत्रणेस सूचनाही दिल्या आहेत. जिल्ह्यात ७८८ बालके हे कधीच शाळेत न जाणारे असल्याचे आढळुन आल्याने याबाबत दखल घेत तात्काळ त्यांना शाळेत प्रवेशित करून घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या होत्या. जिल्हाभरात असे शेकडो बालके आजही शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित आहेत. त्यांना शाळेत दाखल करून शिक्षणाच्या प्रवाहात आणणे ही प्रत्येकांचीच जबाबादारी आहे, शिवाय त्यांना शाळेत टिकवून ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.जिल्ह्यात मागील पाच ते सहा वर्षांपासून बालमजूरीविरोधी धाडसत्र नाही. त्यामुळे अजूनही जिल्ह्यात अनेक बालके बालकामगार म्हणून राबत असल्याचे चित्र आहे. कामगार अधिकारी कार्यालयाकडून मात्र याबाबत दखल घेतली जात नाही. विशेष म्हणजे प्रभारी कामगार अधिकारीही परभणी येथून कारभार पाहतात. कार्यालयास आठवड्यातून एकदा भेट देतात. बालमजूरी विरोधी धाडसत्राबाबत केवळ नियोजन सुरू आहे असे सोपस्कार उत्तर अधिकारी देऊन मोकळे होतात. त्यामुळे जिल्ह्यातील बालकामगारांचा प्रश्न गंभीर असून दुर्लक्षित आहे.एखाद्या दिवसाचे औचित्य साधून किंवा बालकामगार विरोधी मोहिमेसाठी शहरात एखाद्या ठिकाणी कार्यक्रम घेत, बॅनरबाजी करत जनजागृती केली जाते. बस... असा सोपस्कार कार्यक्रम पार पाडला जातो.
निरागस बालके हक्कापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:53 AM