हिंगोली जिल्ह्यात काल पावसाची रिमझिम कमी अन् तुषार असेच स्वरूप जास्त होते. त्यामुळे जिल्हाभर केवळ ६.५० मि.मी. पावसाची नोंद झाली. शुक्रवारी दुपारपर्यंत केवळ ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यातील काही भागात एखादी सर कोसळून जात होती. दुपारनंतर निसर्गाचा नूर पालटला. विविध भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. हिंगोलीसह वसमत, औंढा, कळमनुरी तालुक्यात या पावसाचा जोर चांगलाच होता. जवळा बाजार, आडगाव रंजे या भागात तर या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला होता. अनेक ठिकाणी शेतातही पाणी घुसले. त्यामुळे पिके पाण्याखाली गेली आहेत. वसमत तालुक्यातील कुरुंदा व कौठा परिसरातही हेच चित्र होते. कळमनुरी तालुक्यात दांडेगाव, जवळा पांचाळ, डोंगरकडा, आखाडा बाळापूर या भागातही जोरदार पावसामुळे नदी नाले वाहते झाले आहेत.
या सततच्या पावसामुळे परिसरातील जलसाठ्यांची पाणीपातळी मात्र वाढू लागली आहे. तर दोन दिवसांपासूनच्या रिमझिम पावसामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. काही दिवसांपासून जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे आलेले पाणी थेट वाहून जात असल्याने त्या पावसाचा तेवढा भूजल पातळी वाढीसाठी होत नव्हता.
सततच्या पावसाचा फटका
मागील काही दिवसांपासून सतत होत असलेल्या पावसाचा आता पिकांना फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे. चिभाड्या जमिनीतील पिके आता उधळण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतातील पाण्याचा निचरा होण्यापूर्वीच पुन्हा पाऊस पडत असल्याने पिकांची हिरवी कळा आता पिवळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच काही ठरावीक भागात तर रोजच पावसाचे थैमान सुरू आहे.