हिंगोली : दुचाकींची चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली. त्यांचेकडून छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड जिल्ह्यातून चोरी केलेल्या १० दुचाकी हस्तगत केल्या आहेत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
जिल्ह्यात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. हे पथक वसमत येथे गस्त घालत असताना काही जणांकडे चोरीच्या दुचाकी असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने वसमत येथील दोघांच्या घरी छापा टाकला. या वेळी त्यांच्याकडे दहा दुचाकी आढळून आल्या. दुचाकी चोरीच्या घटनेत जसविंदरसिंग रकबिरसिंग चव्हाण, सतवनसिंग सुभाषसिंग चव्हाण (दोघे रा. रेल्वे स्टेशन रोड वसमत), सचिन मधूकर भोसले (रा. टेंभूर्णी ता. वसमत), भुपेंदरसिंग मोहनसिंग (रा. देऊळगाव राजा जि. बुलढाणा) व गुंज येथील एकाचा सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले. पथकाने दहा दुचाकी ताब्यात घेतल्या. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, गणेश लेकुळे, आकाश टापरे, अजित सोर, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली.
आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताचोरट्यांनी वसमत शहर, कुरूंदा (जि. हिंगोली), अर्धापूर, वजिराबाद (जि. नांदेड), जिनसी(छत्रपती संभाजीनगर), मानवत (जि. परभणी) पोलिस ठाणे हद्दीतून दुचाकींची चोरी केल्याचे तपासात समोर आले. तसेच यात आणखी दुचाकी चोरट्यांचा सहभाग असण्याची व आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.