हिंगोली : सौर ऊर्जा पॉवर प्लांटवरील तांब्याची तार चोरणाऱ्या टोळीचा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. या टोळीकडून पोलिसांनी रोख ५ लाख ८० हजार रुपयांसह ७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या टोळीकडून राज्यभरातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक शेत शिवारातील ४८ एकर शेतजमिनीवर सौर ऊर्जा पॉवर प्लांटचे काम सुरू आहे. यावर मोठे ट्रान्सफाॅर्मर आणण्यात आले होते. चोरट्यांनी संधी साधून यातील २ हजार ६०० लिटर ऑइल व १ हजार ५०० किलो तांब्याची तार लांबविली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर कलासागर यांनी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावरून पथकाने तपास सुरू केला होता.
तपासात सर्जेराव किशन भोसले, दीपक सर्जेराव भोसले (दोघे रा. डिघोळ तांडा, ता. सोनपेठ, जि. परभणी), अनुरथ तातेराव हरगावकर, (रा. बोरखेडी, ता. सेनगाव), अजमत अली मजहर अली (भंगार व्यापारी, रा. परभणी), बंडू उत्तम वायफळकर, अर्जुन उत्तम वायफळकर (दोघे रा. रेणकापूर शिरसी, ता. परभणी), व्यंकटी किशन भोसले (रा. डिघोळ तांडा), पीकअप वाहन मालक इरशाद (रा. नांदेड) व चालक असे नऊ आरोपी गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सर्जेराव भोसले, दीपक भोसले, अनुरथ हरगावकर, अजमत अली यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता या घटनेतील ऑइल जागेवरच सांडून टाकले, तर तांब्यांची तार विकून पैसे वाटून घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तांब्याची तार विकून आलेले ५ लाख ८० हजार रुपये, तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, ४ मोबाइल असा एकूण ७ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिली.
तीन गुन्ह्यांची कबुली; आणखी गुन्हे येणार उघडकीसपोलिसांनी पकडलेल्या टोळीने गोरेगाव, आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) व खामगाव (जि. बुलडाणा) पोलीस ठाणे हद्दीतही अशीच चोरी केल्याची कबुली दिली. तपासात राज्यभरातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची, तसेच आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दरम्यान, ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू, सुनील गोपीनवार, पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, भाग्यश्री कांबळे, पोलीस अंमलदार बालाजी बोके, संभाजी लेकुळे, विठ्ठल कोळेकर, भगवान आडे, शंकर ठोंबरे, विठ्ठल काळे, तुषार ठाकरे, सुमित टाले, इरफान पठाण यांच्या पथकाने केली.