लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी निवड चाचणी परिक्षेत परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांनी उत्तर पत्रिकेची अबदलाबदल केल्याने झालेल्या घटनेमुळे विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून पालकाने या खोलीपुरतीच पुनर्परीक्षा घेण्याची मागणी जवाहर नवोदय विद्यालय वसमत यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.औंढा नागनाथ येथील हुतात्मा स्मारक जिल्हा परिषद प्रशालेत शनिवारी जवाहर नवोदयात प्रवेश मिळविण्यासाठी निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये कक्ष क्र. १३ मध्ये प्रेरणा चिलवंत या विद्यार्थिनीची उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका तिला देण्याऐवजी पर्यवेक्षकांनी दुसऱ्याच मुलाला लिहायला दिली.ही बाब केंद्र प्रमुखांचा १०-१५ मिनीटांनी उशिराने लक्षात आली असता पर्यवेक्षकाला उत्तरपत्रिका व प्रश्न पत्रिका वापस घेऊन क्रमवारीनुसार वाटप करण्याच्या सूचना दिल्या. त्यावेळी उशिर झाला होता. यावेळी उत्तर पत्रिकेवर अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवून उत्तरे लिहिली होती. प्रेरणाला दिलेल्या उत्तर पत्रिकेवर संबंधित मुलाने १० चुकीचे प्रश्न सोडविल्याची माहिती पालकाला दिली. यावेळी महेश चिलवंत यांनी केंद्रप्रमुखांची भेट घेऊन झालेला प्रकार सांगितला असता त्यांनी यावेळी झालेली चूक मान्य करून लेखी स्वरूपात माफिनामा लिहून दिला आहे; परंतु या माफीनाम्यामुळे माझ्या मुलीचे गुणांत वाढ होणार नसून या कक्षातील विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्यावी व दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी नवोदय प्रशासनाकडे लेखी स्वरूपात करण्यात आली आहे.