हिंगोली : सेनगाव तालुक्यातील कोळसा शिवारात हळदीच्या पिकात गांजाचे आंतरपीक घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी छापा मारून १.४५ लाखांचा गांजा जप्त केला आहे.
सेनगाव तालुक्यातील कोळसा शिवारात जगन्नाथ निवृत्ती वाव्हळ याने त्याच्या शेतातील हळदीच्या पिकात गांजाची झाडे लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून सेनगाव पोलिस ठाण्याच्या पथकाने या ठिकाणी छापा मारला. यासाठी त्यांनी दोन सरकारी पंच, स्वस्त धान्य दुकानदार व तलाठ्यांना सोबत नेवून जगन्नाथ हे वहिती करीत असलेल्या गट क्रमांक १०८ मधील शेतात छापा मारला. तेव्हा त्यांना या ठिकाणी लहान मोठी अशी एकूण ३९ झाडे आढळून आली. ही झाडे पोलिसांनी पंचांसमक्ष उपटून त्यांचे वजन केले. ते २९ किलो १०० ग्रॅम एवढे भरले.
या गांजाची अंदाजित किंमत १ लाख ४५ हजार ५०० रुपये एवढी आहे. ही झाडे जप्त करण्यात आली. तसेच जगन्नाथ वाव्हळ यास ताब्यात घेतले असून सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रंजित भोईटे, कर्मचारी शेख खुद्दुस, तुळशीराम वंजारे, संदीप पवार, तुकाराम मारकळ यांनी ही कारवाई केली.