हिंगोली : जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण सुरू आहे. परंतु, काही ठिकाणी पुढाऱ्यांची लुडबूड मात्र होताना दिसून येत आहे. त्यामुळे डॉक्टर, कर्मचाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. आतापर्यंत कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसींचा पहिला डोस ३ लाख ४७ हजार ८८४ तर, दुसरा डोस ९८ हजार ६०० एवढा झाला आहे. जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा, सेनगाव तालुक्यांतील आरोग्य संस्थेत तसेच हिंगोली शहरातील कल्याण मंडपम येथे कोरोना लसीकरण नियमितपणे सुरू आहे. लसीकरणाच्या ठिकाणी गार्डची व्यवस्था नसल्यामुळे बहुतांशवेळा पुढाऱ्यांची लुडबूड पाहायला मिळत आहे. तेव्हा लसीकरणाच्या ठिकाणी कायमस्वरूपी गार्डची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
पहिला डोस ३४७८८४
दुसरा डोस ९८६००
२० हजार डोस शिल्लक...
शहरातील कल्याण मंडपम व जिल्ह्यातील आरोग्य संस्थेत व्यवस्थितरित्या लसीकरण सुरू आहे. आजमितीस जिल्ह्यात २० हजार दोन्ही लसींचे डोस शिल्लक आहेत. नागरिकांनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
ही घ्या उदाहरणे...
१) १४ सप्टेंबर रोजी शहरातील कल्याण मंडपम येथे रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून एकाने वाद घातला होता. सर्व जण रांगेत उभे असतानाही ‘तो’ मात्र आधी लस द्या, असे म्हणत होता. असा प्रकार थांबणे आवश्यक आहे.
२) लसीकरणाच्या ठिकाणी उभे राहून कंटाळा येतो आहे. लस लवकर द्या, असे म्हणत काहींनी दोन दिवसांपूर्वी असाच वाद घातला होता.
३) कोरोना महामारीची तिसरी लाट लक्षात घेता मास्क घालणे आवश्यक आहे. मात्र काही जण मास्क न घालता केंद्रावर येत आहेत. कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांंशी वाद घालत आहेत.
प्रतिक्रिया...
जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांवर लसीकरण नियमितपणे सुरू आहे. लसीकरण केंद्रावर गोंधळ न करता सामाजिक अंतर ठेवत रांगेमध्ये नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. येत्या एक-दोन दिवसांत लसीकरण केंद्रावर गार्डचीही व्यवस्था केली जाईल.
-डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक