हिंगोली : आयपीएल मॅचवर सट्टा खेळविणाऱ्या दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई १९ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता करण्यात आली असून एकास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १ लाख १८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हिंगोली शहरातील मस्तानशहा नगरात एका ठिकाणी आयपीएल मॅचवर चढ्या दराने भाव देवून लोकांकडून पैसे घेऊन सट्टा खेळवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या पथकाने १८ एप्रिल रोजी रात्री ८.३० च्या सुमारास छापा टाकला. यावेळी एकजण ॲपवर लोकांना आयपीएल मॅचवर चढ्या दराने भाव देवून त्यांच्याकडून पैसे घेत सट्टा चालवित असल्याचे आढळून आले. तसेच त्याने अन्य एकास सट्टा देत असल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्याचेकडून रोख ८ हजार २०० रूपये, ४ मोबाईल, एक दुचाकी असा एकूण १ लाख १८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने यांच्या फिर्यादीवरून उददेश धर्मेंद्र जैस्वाल (रा. प्रविणनगर, हिंगोली) व मिस्किन नावाच्या त्याच्या साथीदाविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार नितीन गोरे, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले यांच्या पथकाने केली.