गतिरोधक बनले धोकादायक
हिंगोली : औंढा रोडवरील गतिरोधक धोकादायक बनले असून वाहनचालक गतिरोधकाच्या बाजूने वाहने चालवित आहेत. याच पर्यायी रस्त्याने पादचारीही ये-जा करत आहेत. तेव्हा संबंधित विभागाने याची दखल घेऊन गतिरोधकाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
अतिरिक्त पाण्यामुळे कापसास हानी
हिंगोली : पुढील तीन दिवसांचा पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कापसामध्ये साचलेले अतिरिक्त पाणी काढून टाकावे. कापसात जास्त पाणी झाल्यास कापसाला हानी पोहोचू शकते. तसेच पाऊस उघडल्यावरच कापसावर फवारणी करावी, असे आवाहन ‘वनामकृ’ विद्यापीठाने शेतकऱ्यांंना केले आहे.
‘तीळ, सोयाबीन सुरक्षित ठिकाणी ठेवावे’
हिंगोली : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तीळ, सोयाबीनची काढणी सुरू आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन सदरील पिकांची काळजी घेत शेतकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी ठेवावे. तीळ व सोयाबीन पावसात भिजल्यास खराब होऊन त्यास भावही चांगला मिळत नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
‘पावसाने उघाड दिल्यावर फवारणी करा’
हिंगोली : जिल्ह्यात अधूनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस व इतर पिकांवर फवारणी करू नये. पिकांमध्ये अतिरिक्त पाणी साचले असल्यास त्या पाण्याला वाट मोकळी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
अति पावसामुळे भाजीपाल्यांची नासाडी
हिंगोली : मागच्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे भाजीपाल्यांची नासाडी होत आहे. पालक, कोथिंबीर, चुका, मेथी आदी पालेभाज्यामध्ये अतिरिक्त पाणी झाले असेल तर शेतकऱ्यांनी पाण्याला वाट मोकळी करुन द्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.