लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यातील टाकळगव्हाण येथील वाळू घाटावर वसमतचे प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केलेल्या तपासणीत अनियमितता आढळून आल्याने कंत्राटदारास काळ्या यादीत टाकून कंत्राट रद्द करण्याची शिफारस केली आहे. तर तलाठी उज्जला मैड यांना निलंबित केले आहे.या घाटावर खेडेकर यांनी २१ रोजी भेट दिली होती. या घाटाचा ताबा २४ मे २0१८ रोजी दिला आहे. या ठिकाणी घाट सीमा रेषेवर रोवलेले सहा खांब तुटलेले व पाच रोवलेले आढळले. सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. तर एक पोकलेन मशिन आढळून आली. तपासणीच्या वेळी घाटावर घाटचालक किंवा त्यांचा प्रतिनिधी उपस्थित नव्हता. नमुना खोली खड्डा तयार केला नव्हता. पावती पुस्तके व शिल्लक पावत्यांची संख्याही आढळली नाही. एसएमएस तपासणी करता आली नाही. मॅनेजर नव्हता. अचानक एकजण आला. मात्र त्याच्याकडेही ओळखपत्र नव्हते. वाळूघाटात ४ ते ५ मीटर खोदकाम व घाटाच्या सीमेबाहेरही खोदकाम केलेले आढळले.गावात दक्षता समिती स्थापन केली नाही. घाटावर १४0 ब्रास मातीमिश्रीत वाळूसाठा आढळला. मंजूर वाळूसाठा पूर्णपणे उचलला नसला तरीही अनेक अनियमितता मात्र आहेत. गावात दक्षता समितीही स्थापन केली नसून याबाबत कुणालाच काही माहिती नाही.या सर्व प्रकाराबाबत जवळा बाजार येथील तलाठी उज्ज्वला मैड यांचे दुर्लक्ष असल्याने त्यांना २२ रोजी निलंबित करण्याचा आदेशही उपविभागीय अधिकाऱ्यांनी काढला. तर वाळू कंत्राटदार प्रगती कंन्स्ट्रक्शनचे संदीप नरवाडे यांचा घाटाचा परवाना रद्द करून नाव काळ्या यादीत टाकावे. त्यांची अनामतही जप्त करावी, अशी शिफारस जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या अहवालात केली आहे.
वाळू घाटावर अनियमितता; तलाठी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 1:56 AM