- रमेश कदम
आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : बोल्डा फाटा येथील एका हॉटेलवर सेवानिवृत्त सैनिक आला. हॉटेलमध्ये बोलत उभा असताना त्याच्या कमरेला ' पिस्तुल' असल्याचे दिसले. उत्सुकतेपोटी हॉटेल चालकाने पिस्तुल खरी आहे का ? असे विचारले. तर त्या सेवानिवृत्त सैनिकाने पिस्तुल काढत थेट हॉटेलमध्येच हवेत गोळी झाडली. या प्रकरणाने भेदरलेल्या हॉटेल चालकाने ही बाब पोलिसांना कळवून याप्रकरणी फिर्याद दिली. बाळापूर पोलीस ठाण्यात निवॄत्त सैनिकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बाळापुर पोलीस ठाणे हद्दीतील बोल्डा फाटा ते उमरी जाणाऱ्या रस्त्यावर नंदकुमार गोविंदराव मंदाडे यांचे हॉटेल लीला बार अँड रेस्टॉरंट नावाचे हॉटेल आहे. दिनांक 28 मे रोजी ते हॉटेलवर असताना सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान सेवानिवृत्त सैनिक साहेबराव धोराजी रणवीर व त्यांच्यासोबत इतर दोघे हॉटेलमध्ये आले. हॉटेलच्या उजव्या बाजूला थांबून एकमेकांसोबत बोलत होते. दरम्यान, रणवीर यांच्या कमरेला पिस्तूल दिसले. यामुळे हॉटेल चालकाने उत्सुकतेपोटी पिस्तुल खरे आहे का? असे विचारले. तेव्हा रणवीर यांनी कमरेचे पिस्तूल काढत थेट हॉटेलमध्येच हवेत गोळी झाडली. अचानक गोळीबार झाल्याने हॉटेल मालकासह सर्वजण भयभीत झाले. काही वेळाने सेवानिवृत्त सैनिक रणवीर देखील तेथून गेले. परंतु, या प्रकाराने उपस्थितांमध्ये भीती निर्माण झाली.
या प्रकरणी नंदकुमार गोविंदराव मंदाडे यांच्या तक्रारीवरून सेवानिवृत्त सैनिक साहेबराव धुराजी रणवीर (राहणार पोतरा ) याच्या विरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम 268, 336 व भारतीय हत्यार कायद्याच्या सहकलम 30 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पिस्तुल ही लायसन असलेली असून विनाकारण हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली म्हणून गुन्हा दाखल केला असल्याची माहिती ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांनी दिली आहे. पिस्तुल पोलिसांनी जप्त केले असून हिंगोली शहर ठाण्यात जमा केले आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सेवानिवृत्त सैनिकास ताब्यात घेतले होते. चौकशी करून त्याला सोडण्यात आले असल्याची माहिती बोधनापोड यांनी दिली आहे. विनाकारण झालेल्या गोळीबाराची चर्चा मात्र जिल्हाभरात पसरली आहे.