हिंगोली : एखाद्या पाहुण्याला निरोप द्यायला रेल्वे स्टेशनवर जावे म्हटले तर तेही आता परवडेना झाले आहे. रेल्वे विभागाने गत दोन वर्षांपासून ३० रुपये प्लॅटफार्म तिकीट केले आहे. २०१९मध्ये तर याच प्लॅटफार्म तिकिटाचे दर ५ रुपये होते.
तसे पाहिले तर २०१९पासून कोरोना महामारीमुळे घरात पाहुणे येणेच बंदच झाले आहे. २०२०मध्ये कोरोना महामारीने कहर केला होता. त्यामुळे रेल्वे विभागाने केंद्राच्या सुचनेप्रमाणे प्लॅटफाॅर्मची किंमत ३० रुपये केली आहे. सद्यस्थितीत पाहुणे मंडळींना रेल्वे स्टेशनला जाऊन निरोप द्यावा म्हटले तर तेही आता महागाईच्या काळात परवडेना झाले आहे. हिंगोली जिल्हा छोटा असल्याने प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर कमी असायला पाहिजे. परंतु, त्याचा अद्याप तरी रेल्वे विभागाने विचार केलेला दिसत नाही, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.
असे वाढले दर...
प्लॅटफॉर्म तिकीट २०१९-०५
रेल्वे पार्किंग ०
प्लॅटफार्म तिकीट २०२०-३०
रेल्वे पार्किंग ०
प्लॅटफार्म तिकीट २०२१ -३०
रेल्वे पार्किंग ०
प्लॅटफाॅर्म तिकिटातून रेल्वेची कमाई...
सन २०१९मध्ये प्लॅटफाॅर्म तिकिटाची किंमत ५ रुपये होती. त्यानंतर कोरोनाचा कहर वाढला. या दरम्यान, काही लोक विनाकारण रेल्वे स्थानकावर येत असल्याचे पाहून रेल्वे विभागाने शासनाच्या आदेशानुसार प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत ३० रुपये केली. प्लॅटफाॅर्म तिकिटातून वर्षाकाठी रेल्वे विभागाला ४० ते ४५ हजार रुपये उत्पन्न मिळते, असे रेल्वे विभागाने सांगितले.
गाडी कुठे लावावी हाच प्रश्न?
इतर जिल्ह्यांच्या मानाने हिंगोली रेल्वे स्थानकावर भरपूर जागा आहे. परंतु, येथे कोणाचा कोणाला पायपोस नाही. वाहनचालक कुठेही गाडी लावतात आणि सर्व प्लॅटफाॅर्म फिरून येतात. विशेष म्हणजे गाडी लावण्यासाठी कोणाचे नियंत्रण येथे नाही. अशावेळी गाडी चोरीला जाण्याची दाट शक्यता असते.
प्रतिक्रिया...
‘नो पार्किंग’च्या जागी लावली जातात वाहने...
रेल्वे विभागाने ‘नो पार्किंग’ असे फलक लावले आहेत. परंतु, वाहनचालक मात्र कुठेही वाहने उभी करत आहेत. पाहुण्याला सोडायला आले की, अर्धे लक्ष हे गाडीमध्येच असते. कारण गाडी चोरीला जाण्याची भीती जास्त आहे. प्लॅटफॉर्मची किंमत वाढविण्यापेक्षा पार्किंगची व्यवस्था रेल्वे विभागाने करावी.
-सुकेश खराटे, प्रवासी
रेल्वे विभागाचे अधिकारी स्टेशनची पाहणी करण्याकरिता आले की, पार्किंगच्या ठिकाणी साफसफाई केली जाते. गाडी पार्किंगच्या ठिकाणी उभी करा, असेही सांगितले जाते. परंतु, नंतर मात्र ‘जैसे थे’ स्थिती होते, असे एका नागरिकाने सांगितले.
प्रतिक्रिया
वाहन पार्किंगबाबत रेल्वे विभागाच्या वतीने टेंडर काढले जाते. परंतु, अद्याप तरी कोणीही टेंडर घेतले नाही. रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक वाहनचालकांना वाहने व्यवस्थित उभी करा, अस्ताव्यस्त उभी करू नका, असे सांगितले जाते. काही वाहनचालक वाहने अस्ताव्यस्तपणे उभी करतात. त्यामुळे त्यांना सूचना दिली जाते.
- अलोक नारायणन, स्टेशन मास्टर, हिंगोली