पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोलीचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या आदेशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचे आदेश लागू आहेत. या काळात संपूर्ण बाजारपेठ बंद असताना २० एप्रिल रोजी आखाडा बाळापूर येथील कापड दुकानदार शटर उघडून ग्राहकांना आतमध्ये घेऊन दुकान चालवित होता. येथील मुख्य रस्त्यावर बालाजी कलेक्शन दुकान आहे. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आठ ते दहा ग्राहकांना कापडाची विक्री सुरू होती. पोलिसांना ही खबर मिळताच ठाणेदार रवि हुंडेकर, बीट जमादार जाधव, बोधनवाड यांच्या पथकाने थेट दुकानात धाड टाकली. पोलिसांच्या धाडीमुळे दुकानदार आणि ग्राहक चेहरा लपवित बाहेर जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्यांना बाहेर पळता आले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत स्वत:च्या फायद्यासाठी कापड दुकान उघडून कोविड १९चा रोग पसरवण्याची हयगयीची कृती केली म्हणून बीट जमादार संजय लक्ष्मण मार्के यांच्या फिर्यादीवरून कापड दुकानदार बालाजी बापूराव येरावार याच्या विरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास संजय मार्के करीत आहेत. या घटनेमुळे पोलिसांशी लपवून दुकानदारी करणाऱ्या दुकानांमध्ये दहशत पसरली आहे. या कारवाईमुळे अनेक दुकानदारांनी पळ काढल्याचे चित्र पहावयास मिळाले.
फोटो :