हिंगोली : हिंगोली ते मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस रेल्वेगाडी शुभारंभाचा ७ मार्चचा मुहूर्त टळल्यानंतर आता ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे हिंगोली रेल्वेस्थानकावर हिरवा झेंडा दाखविणार आहेत. या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे.
हिंगोली- पूर्णा मार्गे मुंबईसाठी रेल्वेगाडीची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. त्यासाठी अनेक वेळा आंदोलनही करण्यात आली. तसेच रेल्वे राज्यमंत्र्यांसह केंद्रस्तरावर ही प्रयत्न झाले. अखेर या मागणीला यश आले असून, जनशताब्दीच्या हिंगोली पर्यंतच्या विस्ताराला रेल्वे विभागाने मंजुरी दिली. यामुळे हिंगोलीकरांना आता मुंबई सोयीचे होणार आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस शुभारंभाचा मुहूर्त ७ मार्च रोजी ठेवण्यात आला होता. मात्र, हा मुहूर्त टळला. आता ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, खा. हेमंत पाटील, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. संतोष बांगर, आ. चंद्रकांत नवघरे, आ. प्रज्ञाताई सातव आदींची उपस्थिती राहणार आहे. ही रेल्वे हिंगोली रेल्वे स्थानकाहून वसमत, पूर्णा, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर मार्गे मुंबईच्या दिशेने धावणार आहे. जनशताब्दी एक्स्प्रेसला एकूण २२ बोगी असून त्यामध्ये १९ बोगी जनरल राहणार आहेत तर एक वातानुकूलित राहणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.
१० मार्चपासून नियमित वेळापत्रकानुसार धावणार ‘जनशताब्दी’..जनशताब्दी एक्स्प्रेसचा विस्तार करण्यात आल्याने हिंगोलीकरांना दिलासा मिळाला असून, मुंबई गाठणे आता सोयीचे झाले आहे. ९ मार्च रोजी शुभारंभानंतर १० मार्चपासून ही एक्स्प्रेस रेल्वेगाडी नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे. हिंगोली रेल्वे स्थानकाहून पहाटे ४:२० वाजता निघणार असून, सकाळी ९ वाजता जालना येथे पोहोचणार आहे. तर दुपारी ४:५० वाजता सीएसटीएम (मुंबई) येथे पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात ही रेल्वे सीएसटीएम (मुंबई) येथून दुपारी १२:१० वाजता सुटणार असून, रात्री ७:५० वाजता ती जालना येथे पोहोचणार आहे. तर रात्री १२:३० वाजता हिंगोली रेल्वेस्थानकावर येणार आहे.
डिझेलवरच धावणार ‘जनशताब्दी एक्स्प्रेस’...रेल्वे विभागाच्या वतीने बहुतांश लोहमार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. हिंगोली ते पूर्णा सिग्नलपर्यंत हे काम पूर्ण झाले असून, काही काम शिल्लक आहे. त्यामुळे शनिवारपासून सुरू होणारी जनशताब्दी एक्स्प्रेस ही पूर्णापर्यंत डिझेलच्या इंजिनवर धावेल आणि पूर्णापासून पुढे विजेवर चालणारे इंजिन जोडण्यात येईल, अशी शक्यता होती. मात्र, रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्यातरी हिंगोली ते मुंबई दरम्यान ही रेल्वेगाडी डिझेलवरील इंजिनवरच धावणार आहे. पूर्णा जवळील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर जनशताब्दी रेल्वे विजेवर चालणाऱ्या इंजिनवर धावण्याची शक्यता आहे.