कळमनुरी : तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून, १३ जानेवारी रोजी तहसील कार्यालयात मतमोजणी पर्यवेक्षक व सहाय्यकांची बैठक घेण्यात आली. दिनांक १८ जानेवारी रोजी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची मतमाेजणी २५ टेबलवर हाेणार आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजता क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना ईव्हीएम मशीन हाताळणीबाबत उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार दत्तू शेवाळे, नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांनी मार्गदर्शन केले. तसेच दुपारी २ वाजता पर्यवेक्षक व सहाय्यक यांची बैठक घेऊन त्यांना मतमोजणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मतमोजणीकरिता २५ टेबल राहणार आहेत. या टेबलवर २५ पर्यवेक्षक व २५ सहाय्यक पर्यवेक्षक असणार आहेत. १८ जानेवारी राेजी एकूण २७५ मतदान केंद्रांकरिता ११ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. मतदान यंत्राच्या मतमोजणी अगोदर टपाली मतपत्रिकांची मोजणी होणार आहे. या बैठकीला गटविकास अधिकारी डॉ. आदिनाथ आंधळे, तालुका कृषी अधिकारी गजानन पवार, मुख्याधिकारी उमेश कोठीकर, अब्दुल खालेक, राजकुमार उंडगे, सय्यद अनिस, संतोष खिल्लारे आदी उपस्थित होते.