लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा मजूर फेडरेशनच्या सभापतीपदी ज्ञानेश्वर जाधव यांची तर उपसभापतीपदी नईम कुरेशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहात इतका जल्लोष केला की, जणू पक्षाच्या कार्यालयातच कार्यक्रम सुरू असल्याचे चित्र दिसून येत होते.जिल्हा मजूर फेडरेशनवर अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस व अडीच वर्षे काँग्रेसचा सभापती राहील, या करारानुसार शशिकांत वडकुते यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला होता. नंतर उपसभापती राजाराम बांगर यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे एकत्रित झालेल्या निवडणूक कार्यक्रमात आज सभापती-उपसभापतीपदाच्या निवडीचा कार्यक्रम पार पडला. यात सभापतीपदासाठी एकमेव ज्ञानेश्वर जाधव तर उपसभापतीपदासाठी वसमतचे नईम कुरेशी यांचा अर्ज आला होता. त्यामुळे या दोघांचीही बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर शासकीय विश्रामगृहात आ.रामराव वडकुते, आ.संतोष टारफे, जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे, अॅड. बाबा नाईक, संजय दराडे, डॉ.सतीश पाचपुते, धनंजय सूर्यवंशी, श्यामराव जगताप, डी.डी. जयस्वाल, शशिकांत वडकुते आदींच्या उपस्थितीत नवनिर्वाचितांचा सत्कार करण्यात आला.या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजीही केली.
मजूर फेडरेशनच्या सभापतीपदी जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 12:44 AM