हिंगोली : जैन साधू आचार्य कामकुरमारनंदी महाराज यांचे अपहरण करून हत्या केल्याच्या निषेधार्थ हिंगोली येथील जैन बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला. यामध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळी १०:३० च्या सुमारास जैन बांधवांनी महावीर भवन येथून हा मोर्चा काढला. गांधी चौक मार्गे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यामध्ये मोठ्या प्रमाणात पुरुष व महिलांचाही समावेश होता. हातात विविध घोषणांचे फलक घेवून ही मंडळी सहभागी झाली होती. यानंतर जिल्हा प्रशासनास निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, बेळगावच्या चिक्कोडीनजीक हिरकोडी येथे जैन साधू आचार्य कामकुमारनंदी महाराज यांची ५ जुलै २०२३ रोजी अपहरण करून अज्ञातांनी त्यांची ७ जुलै रोजी हत्या केली. यामुळे संपूर्ण जैन समाजात नाराजीचा सूर आहे.
या हत्या प्रकरणातील दोन गुन्हेगारांना पोलिसांनी पकडले आहे. मात्र जैन समाजातील संतांवर वारंवार हल्ले होत आहेत. या वाढत्या घटनांमुळे अहिंसाप्रेमी समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटना यापुढे घडू नयेत, यासाठी ठोस उपाय करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनावर मिलींद यंबल, प्रकाश सोनी, रत्नदीपक चवरे, आनंद सातपुते, डॉ.प्रेमेंद्र बोथरा, अॅड. मनीष साकळे, चंद्रशेखर कान्हेड, राजेश यरमळ, सुधीर सराफ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.