हिंगोली: सहकार क्षेत्रातील अग्रणी व महाराष्ट्राचे माजी सहकार व वस्त्रोद्योग मंत्री जयप्रकाश रावसाहेब (साळुंके) दांडेगावकर यांची आज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीच्या अध्यक्षपदी निवड झाली. ही निवड महासंघाच्या संचालक मंडळाच्या 214 व्या शिखर बैठकीत एकमताने करण्यात आली. दांडेगावकर यांच्यापूर्वी दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष होते. परंतु त्यांचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
जयप्रकाश दांडेगावकर हे सहकारी साखर कारखाना क्षेत्राशी दीर्घ काळापासून संबंधित आहेत. सध्या ते महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना फेडेरेशन, मुंबईचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय ते हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्षही आहेत. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे वरिष्ठ संचालक म्हणून काम करताना त्यांनी साखर कारखाना क्षेत्रात सुधार होण्याचा जोरदार पाठपुरावा केला आहे. महाराष्ट्राचे कामगार मंत्री आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे मावळते अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दांडेगावकर यांच्या निवडीचे स्वागत केले. दांडेगावकर हे अनुभवी नेते व कुशल प्रशासक आहेत. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे वाटचाल करेल असा विश्वास व्यक्त केला. उपाध्यक्ष केतनभाई पटेल यांनी, साखर कारखाना महासंघ या क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाची भूमिका बजावेल असे सांगून दांडेगावकर यांचे नेतृत्व महासंघाला निश्चितपणे पुढे नेईल अशी भावना व्यक्त केली. तर महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली महासंघ नवे विक्रम स्थापित करेल अशा शुभेच्छा दिल्या.
सहकारी साखर कारखान्यांच्या गुणवत्ता वाढीवर भरही निश्चितपणे एक मोठी जबाबदारी आहे. सहकारी साखर क्षेत्राचा आवाज सर्वांच्या सहकार्याने, प्रभावीपणे उठविण्यात येईल. या क्षेत्राशी संबधीत प्रश्न ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांच्या समस्या, रास्त दर, उसाची थकबाकी, उसाला देण्यात येणारी किमान आधारभूत किंमत, कारखान्यांना मिळणारा वित्तीय पुरवठा, त्यातील व्यावहारिक अडचणी, साखरेची निर्यात याबाबतच्या प्रश्नांचा केंद्र व राज्य शासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करू. सहकारी साखर कारखान्यांची गुणवत्ता वाढावी, त्यांचा आर्थिक व वाणिज्यविषयक कारभार अधिक चोख व्हावा यासाठी आपण संचालक मंडळाच्या सहाय्याने प्रयत्न करू. - जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली