कळमनुरी : तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून, मतदान १५ जानेवारी रोजी होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण २ जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह येथे दोन सत्रात होणार असल्याची माहिती तहसीलदार दत्तू शेवाळे यांनी दिली.
मतदान प्रक्रियेबाबत केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार दत्तू शेवाळे, नायब तहसीलदार प्रवीण ऋषी आदी मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. हे प्रशिक्षण सकाळी १० ते १ व दुपारी २ ते ५ या वेळेत दोन सत्रात होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी कमी पडत आहेत. हे कर्मचारी इतर तालुक्यातून देण्यात यावेत, अशी मागणी तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मतदान प्रक्रियेसाठी २०००च्या जवळपास कर्मचारी लागणार आहेत. तालुक्यात १५०० च्या जवळपासच कर्मचारी असल्यामुळे उर्वरित कर्मचारी देण्याची मागणीही तहसीलदारांनी केली आहे. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण २ जानेवारी रोजी होणार असून, या प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.