औंढा नागनाथ : उमरखेड येथे एका लग्नसमारंभासाठी जात असलेल्या नातेवाईकांची क्रुझर जीप लिंबाळा पाटीवर रानडुक्करांचा कळप आडवा आल्याने उलटली. यात एक ५ वर्षीय बालक जागीच ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास घडली. सर्व जखमी हे औरंगाबाद येथील रहिवासी असून नातेवाईकाच्या लग्नासाठी उमरखेड येथे जात होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, उमरखेड येथे लग्न समारंभासाठी औरंगाबाद येथून ११ जण एका क्रुझर जीपमधून (एम एच 20 डीजे 8849 ) जात होते. पहाटे ३ वाजेच्या सुमारास लिंबाळा पाटीजवळ रस्त्या लगतच्या शेतातून अचानक रानडुक्करांचा कळप आल्याने चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले. यामुळे वेगात असलेल्या जीपने दोन तीन वेळेस उलटली. यात जीपमधील पाच वर्षीय बालक गणेश अवधूत खरुसकर याचा जागीच मृत्यू झाला. तर तनुजा जाधव, जयश्री जाधव, राजू काळे आणि प्रवीण रुपनर प्रवासी जखमी आहेत. हे सर्व प्रवासी औरंगाबाद येथे कपनीत काम करतात. ते नातेवाईकांच्या लग्नासाठी उमरखेडला जात होते.
दरम्यान, लिंबाळा येथील विलास खरुसकर, शालिक जाधव, उत्तम जाधव, प्रकाश पवार आदींनी जखमींना बाहेर काढून औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी हिंगोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.