हिंगोली : पुण्याहून हिंगोलीकडे ट्रॅव्हल्समधून येणाऱ्या सराफा व्यापाऱ्याचे दहा लाख रुपयांचे दागिने असलेला डबा चोरट्यांनी पळविल्याची घटना १0 फेब्रुवारीच्या रात्री घडली.
हिंगोली येथील कासारवाडा भागातील प्रदीप लक्ष्मीनारायण उपाध्ये हे सोन्या-चांदीचे व्यापारी आहेत. ते नेहमीच पुणे, मुंबई आदी ठिकाणाहून सोन्या-चांदीचे दागिने व इतर खरेदी करीत असतात. सोन्याचे दागिने खरेदीसाठीच ते पुणे येथे गेले होते. खरेदी झाल्यानंतर पुणे येथून १0 फेब्रुवारी रोजी रात्री ९.१५ च्या सुमारास पुणे-हिंगोली या खाजगी बसमध्ये ते बसले. बॅगेमध्ये त्यांनी दोन वेगवेगळ्या डब्यांमध्ये सोन्याचे दागिने ठेवले होते. चोरट्यांनी ही बॅग कापून यातील २६७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ठेवलेला एक डबा पळविला. या दागिन्यांची किंमत १0 लाख ७६ हजार एवढी आहे.
कमरबंद, झुमके, बांगड्या आदी विविध प्रकारचे दागिने यात होते. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३0 च्या सुमारास हिंगोलीत आल्यानंतर ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. दोनपैकी एक डबा गायब झाल्यानंतर त्यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी वैंजणे, पोनि सय्यद, फौजदार एन.जी.केणेकर यांनी भेट दिली. याप्रकरणी बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.