हिंगोली : येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे मागील तीन महिन्यांपासून अध्यक्षपद रिक्त आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याची प्रकरणे प्रलंबित आहे. कार्यालयीन कामे सुरू असली तरी न्यायालयीन कामकाज बंद आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या ग्राहक न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.विविध विक्रेते, सेवा पुरवठादार यांच्याविरुद्ध जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचची स्थापना करण्यात आली आहे. ग्राहकांची फसवणूक झाल्यास संबंधित कंपनी, विक्रेता किंवा पुरवठादाराकडून जिल्हा तक्रार निवारण मंचकडून ग्राहकाला नुकसान भरपाई मिळवून दिली जाते. परंतु हिंगोली येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचला मागील तीन महिन्यांपासून अध्यक्षच नाही. त्यामुळे अनेक न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित आहेत. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे न्यायालयीन कामकाज अध्यक्ष व सदस्य पाहतात. दोघांच्या उपस्थितीमध्ये खटला चालतो.मात्र सदस्य असले तरी, अध्यक्ष पद रिक्तच आहे. परिणामी, तक्रारदारांची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. अध्यक्ष मिळताच मात्र न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यास मदत होणार आहे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच हिंगोली येथे पुर्वी कार्यरत अध्यक्षा ए. जी. सातपुते यांच्याकडे सध्या परभणी येथील कार्यभार दिला आहे. त्यांच्याकडे हिंगोली येथील प्रभार होता. हिंगोली येथील रिक्त अध्यक्ष पदासंदर्भात त्यांना दुरध्वनीवरून संपर्क केला असता त्या, म्हणाल्या सध्या पूर्वस्तर नियुक्तीचे काम झाले असून प्रशासकीय मान्यता मिळताच हिंगोली येथे रूजू होता येईल, असे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच हिंगोली येथे ६ फेबु्रवारी २०१८ पूर्वी प्रभारी अध्यक्षा म्हणून ए. जी. सातपुते रूजू होत्या. त्यानंतर मात्र येथील अध्यक्षपदाची जागा रिक्तच आहे. दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येथील ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत प्रकरणे निकाली काढली जात असत. परंतु सध्या अध्यक्षच नसल्याने मात्र येथील न्यायालयीन कामकाज बंद आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील अध्यक्षांच्या रिक्त पदामुळे येथे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध कार्यालयीन अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कार्यालयीन कामकाज सुरू असले तरी न्यायालयीन प्रकरणे प्रलंबितच आहेत.
अध्यक्षाविना न्यायालयीन कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 1:30 AM