हिंगोली जिल्ह्यात मध्यंतरी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला होता. जवळपास साडेपाचशे रुग्ण ऑक्सिजनवर होते. त्याचा परिणाम म्हणून खाजगी व शासकीय रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यानंतरचे बरेच दिवस ऑक्सिजनचा तुटवडा कायम होता. काही खाजगी रुग्णालयांना तर मोठी अडचण आल्याने त्यांनी रुग्ण शासकीय रुग्णालयात पाठविले. त्यामुळे शासकीय यंत्रणेवर अधिकचा ताण पडला होता. यादरम्यान जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटच्या कामाला गती आली. मागच्या महिन्यात हा प्लांट सुरू झाली. त्यानंतर ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या कमी झाली आणि सध्या गरज नाही म्हणून तो तसाच बंद ठेवला. काही दिवसांनी वेगवेगळ्या भागासाठी जोडणी करून येथून ऑक्सिजन पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, रुग्णसंख्या घटताच हे नियोजन गुंडाळून ठेवण्यात आल्याचे दिसते. बाहेरून विकतचा ऑक्सिजन आणण्यापेक्षा येथेच तयार होणारा ऑक्सिजन वापरणे जास्त सोयीचे असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. जवळपास ५० बेडला पुरेल एवढी ऑक्सिजनिर्मिती या प्लांटमधून होऊ शकते. मात्र, तेवढ्याच जोडण्यावर त्यावर ठेवण्याचे नियोजन करण्यासाठी सध्या आरोग्य यंत्रणेला वेळ नाही. तसेही या प्लांटवर झालेला मोठा खर्च लक्षात घेता तो वापरात राहणे जास्त गरजेचे आहे. अन्यथा मॉडेल म्हणून हिंगोलीला आलेल्या प्रत्येक मान्यवराला दर्शन घडविण्यापुरताच हा प्लांट उपयोगाचा ठरण्याची भीती आहे.
अन्यथा बंद राहूनच खराब होईल
जिल्हा रुग्णालय असो वा इतरत्र जास्त काळ एखादी बाब बंद राहिली तर ती तशीच तांत्रिक बिघाडाने निकामी ठरण्याची भीती असते. दैनंदिन वापरातून समस्याही समोर येतात, वेळेत दुरुस्ती होते. अन्यथा तशीच बंद राहिल्यास कोट्यवधीचा खर्च पाण्यात जातो. असा प्रकार इतर अनेक उपकरणांबाबत घडलेला आहे.
अधून-मधून चालू केला जातो
या प्लांटवर तिसऱ्या लाटेत बालकांना असलेला धोका लक्षात घेता तयार करण्यात आलेल्या ५० बेडचे रुग्णालय चालविण्यात येणार आहे. त्यासाठी जोडणीही करून ठेवली. प्लांटच्या देखभालीसाठी अधूनमधून तो सुरू केला जातो. सध्या रुग्णही घटल्याने वापर कमी झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.
वसमत व कळमनुरीचा कार्यारंभ आदेश
स्व. राजीव सातव यांनी जिल्ह्यातील सर्वच गरजेच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांटसाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्यापैकी वसमतचे दोन, तर कळमनुरीच्या एका प्लांटच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. तर औंढा, सेनगाव व आखाडा बाळापूर येथे नॅशनल हायवे ॲथॉरिटीकडून सीएसआरमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारून दिला जाणार असल्याचे जयवंशी यांनी सांगितले.