के. सी. वेणुगोपाल यांनी केले सातव कुटुंबीयांचे सांत्वन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 08:41 AM2021-05-27T08:41:01+5:302021-05-27T08:42:00+5:30
काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी कळमनुरी येथे भेट देत दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच बंद खोलीत त्यांच्याशी चर्चा केली.
हिंगोली : काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी कळमनुरी येथे भेट देत दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच बंद खोलीत त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, सातव कुटुंबीयांपैकी एकास राज्यसभेवर घेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. तसे निवेदनही वेणुगोपाल यांना देण्यात आले.
वेणुगोपाल हे बुधवारी दिल्लीहून विमानाने नांदेडला आले. त्यानंतर त्यांनी थेट कळमनुरी गाठून येथे खासदार सातव कुटुंबीयांची भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना छायाचित्र काढण्यास मनाई करण्यात आली होती. कळमनुरी येथे सातव कुटुंबीयांचे सांत्वन करीत त्यांनी सुमारे वीस मिनिटे चर्चाही केली. अत्यंत गोपनीय चर्चा असल्याने त्या ठिकाणी सातव कुटुंबीयांशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात आलेला नाही. त्यानंतर खासदार सातव यांना श्रद्धांजली अर्पण करून ते दिल्लीकडे रवाना झाले. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वेणुगोपाल यांच्या गोपनीय दौऱ्यामुळे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष आता दिल्लीकडे लागले आहे.
यावेळी वेणुगोपाल यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी संपतकुमार, पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, आ. अमर राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, आदींची उपस्थिती होती.