हिंगोली : जिल्ह्यातील वसमत व कळमनुरी तालुक्याला पाच दिवसात दुसऱ्यांदा अतिवृष्टीचा फटका बसला असून यावेळी औंढा तालुक्यातही अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील एकूण ३० पैकी १९ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर पुलावरून पाणी वाहत असल्याने २० ते २५ गावांचा संपर्क तुटला आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील सहा दिवसांतच मान्सूनमधील एकूण सरासरीच्या ५० टक्के पर्जन्यमान झाले आहे. सुरुवातीला पाऊस पडत नसल्याने पेरण्या लांबल्या होत्या. आता पाऊस थांबायला तयार नाही. बुधवारी सकाळी ८ वाजेपूर्वीच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ८४.९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक १३२.६० मिमी पर्जन्य एकट्या कळमनुरी तालुक्यात झाले. हिंगोली ६१.४० मिमी, वसमत ९९.५० मिमी, औंढा ७४.५० मिमी, सेनगाव ५४.४० मिमी अशी नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ४०९ मिमी पर्जन्य आतापर्यंत झाले. मान्सूनमधील सरासरीच्या ५१.५१ टक्के, तर ऑक्टोबरपर्यंतच्या सरासरीच्या ४७.६६ टक्के एवढे पर्जन्यमान झाले आहे.
मंडळनिहाय पर्जन्यमानमंडळनिहाय हिंगोली ५६.८ मिमी, नर्सी नामदेव ५३.३, सिरसम १०७.३, बासंबा ५४.१, डिग्रस कऱ्हाळे ५७.८, माळहिवरा ४७.३, खांबाळा ५३.३, कळमनुरी ७८.८, वाकोडी ९२.३, नांदापूर ७९.५, आखाडा बाळापूर २१०.५, डोंगरकडा १२४, वारंगा फाटा २१०.५, वसमत ११०.८, आंबा ९७.८, हयातनगर १२५.३, गिरगाव ९६.८, हट्टा ७९.८, टेंभूर्णी ९२.५, कुरुंदा ९३.८, औंढा ७३.३, येहळेगाव ७२, साळणा ७३.३, जवळा बाजार ७९.५, सेनगाव ५६.५, गोरेगाव ५१.३, आजेगाव ५५.३, साखरा ४७.३, पानकनेरगाव ४०.३ तर हत्ता मंडळात ७५.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस ३० पैकी १९ मंडळांत झाला आहे.