कळमनुरी: येथील नगरपालिकेच्या गार्डनला १० फेब्रुवारी रोजी दुपारी दीड ते पावणेदोन वाजेच्या दरम्यान अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
कळमनुरी नगरपालिकेच्या वतीने तीन ते चार कोटी रुपये खर्च करून गार्डन तयार केले. मात्र अजूनही हे गार्डन नागरिकांसाठी खुले करण्यात आले नव्हते. कळमनूरीकरांसाठी विरंगुळा म्हणून गार्डन तयार केले. या गार्डनमध्ये लहान मुलांच्या खेळण्याचे साहित्य, महाग मोलाची झाडे लावली होती. मात्र बुधवारी लागलेल्या आगीत खेळण्याचे साहित्य, किमती झाडे, व इतर साहित्य जळून खाक झाले आहेत. यामध्ये माेठे नुकसान झाले आहे.
बुधवारी नपचे कर्मचारी गार्डन मधील गवत काढण्याचे काम करीत होते. परंतु अचानक दीड ते पावणेदोन वाजेच्या दरम्यान आग लागली. या आगीत अर्ध्यापेक्षा जास्त गार्डन जळून खाक होऊन यात लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाली. ही आग कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही. नपच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाने आग विझविली.
नपचे गार्डन सर्वांसाठी खुले करावे या मागणीसाठी मनसेच्या वतीने ८ फेब्रुवारी राेजी धरणे आंदोलन केले होते. लवकरच हे गार्डन नागरिकांसाठी खुले करण्यात येईल असे आश्वासन आंदोलन कर्त्यांना दिले. तसेच नगरसेवक इलियास नाईक यांनीही गार्डन सर्वांसाठी खुले करावे यासाठी नपला निवेदन दिले होते. गार्डन सर्वांसाठी लवकर खुले न केल्यास ‘ढोल बजावे’ आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. या आगीने मात्र नपचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गार्डनला आग लागल्याचे कळताच नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, नगरसेवक म. नाजिम रजवी, इलियास नाईक, अ.समद, मुख्याधिकारी उमेश कोठीकर, ए.डी. दायमा, डी.ए. गव्हाणकर, डाखोरे, यरमल आदिनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर फौजदार ज्ञानोबा मुलगीर, आर.पी. जाधव, विक्की उरेवार आदींनी गार्डनला भेट देऊन पाहणी केली.