कळमनुरी (हिंगोली ) : येथील उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १२ जुलैपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. उपचारासाठी येणारे रूग्णासोबतचे नातेवाईक अधिकारी व कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागत असून दमदाटी केली जात असल्याने कामबंद आंदोलन करण्यात येत आहे.
उपजिल्हा रूग्णालयातील जवळपास ६८ अधिकारी व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले असून सकाळपासूनच आंदोलन सुरू आहे. कामबंद आंदोलनामुळे मात्र उपचारासाठी येणाऱ्यांची गैरसोय होत आहे. रूग्ण्सेवा विस्कळीत झाली असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहिल असा पावित्रा वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. आंदोलनात वैद्यकीय अधिकारी डॉ. एफ. जी. शेख, डॉ. ए. बी. बांगर यांच्यासह १२ वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी एकूण ६८ जण सहभागी झाले आहेत.