आखाडा बाळापूर ( हिंगोली): दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कयाधू नदीने रौद्ररूप धारण केले आहे. रविवारी मध्यरात्री १२ वाजेनंतर कयाधू नदीला महापूर आला आहे. अनेक शेतांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. पुराच्या विळाख्याने आखाड्यांवर राहणारे मजूर शेतामध्येच अडकले आहेत.
कळमनुरी तालुक्यातील देवजना गावाला पुराचा वेढा असल्याने शिवारातील २० मजूर शेतात अडकले आहेत. मजुरांनी शेतातील टिन पत्र्याच्या शेडवर जाऊन जीव वाचवला. दरम्यान, तहसीलदार जीवक कांबळे यांनी देवजना गावाला भेट देऊन पाहणी केली . आपत्कालीन सुरक्षारक्षकांना पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफचे जवान येऊन लवकरच या लोकांची सुटका करतील असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
जनावरांसाठी दोघे शेतात थांबलेडोंगरगाव पूल येथील चार जण पुराच्या विळख्यात अडकले होते. त्यातील दोघांना सूरक्षीत बाहेर काढण्यात आले आहे . तर दोघेजण शेतात बांधलेल्या जनावरांना सोडण्याचा प्रयत्न करत पुराच्या पाण्यातच थांबले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. कयाधू नदीला आलेल्या मोठ्या पुराचा परिसरातील अनेक गावांना फटका बसला आहे.