ऑनलाइन लोकमतहिंगोली, दि. 24 - जिल्ह्यात केबीसीच्या जाळ्यात सापडलेल्या अनेकांचा जीव अजूनही टांगणीलाच लागलेला असून, करोडपती तर बनलेच नाही. मात्र पैशांसाठी लोकांच्या घराकडे चकरा सहन करणारे अजूनही हैराण आहेत. यातील आरोपी ताब्यात घेण्यासाठी सीआयडी आता नाशिक पोलिसांकडे प्रयत्न करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हिंगोेली जिल्ह्यात केबीसीमध्ये अल्पावधीत दामदुप्पट रक्कम मिळविण्याच्या मोहात अनेकांनी त्यात गुंतवणूक केली होती. शहर असो वा ग्रामीण भागातील लोकांनी कमिशन मिळत असल्याने त्याचे मोठे जाळे उभारले होते.
एजंटांनीही जास्तीची रक्कम हाती न ठेवता मिळालेले कमिशनही त्यातच गुंतविले होते. त्यामुळे यातील पूर्ण पैसा आपोआप हे नेटवर्क चालविणाºयांकडे जात होता. नात्या-गोत्यातील लोकांसह मित्र परिवारातील लोकांना ही स्कीम सांगून पटविले. त्यात मी स्वत: केलेली गुंतवणूक, त्यामुळे आलेली सुबत्ता पटवून सांगितल्याने हजारो लोकांना चुना लागला आहे. यात कळमनुरी येथे गुन्हा दाखल झाला होता. त्याच्याशीच इतरांचीही शेकडो प्रकरणे जोडण्यात आली. सीआयडीकडे नंतरही अनेकांनी आपल्या मूळ दस्तावेजासह तक्रारी दिल्या आहेत. अजूनही हा ओघ सुरू असल्याचे सांगितले जाते. यातील आरोपी छबु चव्हाण व आरती चव्हाण हे सध्या नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहेत. ते हिंगोली सीआयडीच्या ताब्यात मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याला मंजुरी मिळाल्यास लवकरच हे आरोपी हिंगोली जिल्ह्यात आणले जातील, असे सांगण्यात आले.