हिंगोली : घरकुल लाभार्थी ‘ड’ यादीतून ‘ब’ यादीत नावे समाविष्ट करून घेण्यासाठी १० हजारांची लाच स्वीकारतांना कळमनुरी येथील केंद्रप्रमुख तथा अतिरिक्त विस्तार अधिकाऱ्यास एसीबीने आज अटक केली. बालाजी मारोतराव गोरे असे अधिकाऱ्याचे नाव असून ही कारवाई कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील एका हॉटेलमध्ये झाली.
सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार व त्यांचे भाऊ, वडील या तिघांचेही नाव घरकुल लाभाच्या ‘ड’ यादीत आले होते. परंतु केंद्रप्रमुख बालाजी गोरे यांनी क्रॉस चेकींग केली. तसेच तक्रादारास गोरे यांनी घरकुल लाभाच्या ‘ड’ यादीतून ‘ब’ यादीत नाव समाविष्ट केल्यास पहिल्या यादीतील अनुदान मिळेल असे सांगितले. हे काम करण्यासाठी बालाजी गोरे यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रूपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १० हजार रूपये स्वीकारण्याचे गोरे यांनी संमती दिली.
तक्रारदार यांनी रितसर याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केल्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून एसीबीच्या पथकाने कारवाई केली. यावेळी केंद्रप्रमुख बालाजी गोरे यांना १० हजारांची लाचेची रक्कम तक्रादाराकडून स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक रविंद्र थोरात, पोनि नितीन देशमुख, पोनि जितेंद्र पाटील व पथकाने केली.