हिंगोली : कोरोनाच्या पहिल्या लाटेला समर्थपणे तोंड देत परतवून लावलेल्या पोलिसांना दुसऱ्या लाटेने घेरले आहे. फेब्रुवारी २१पर्यंत ४१ पोलिसांनाच कोरोना झाला होता. दुसऱ्या लाटेत मात्र तब्बल ६८ जणांना कोरोनाबाधित व्हावे लागले असून, दोन जणांना मृत्यूने गाठले. त्यामुळे पोलीस कर्मचारी रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी योगा, प्रोटीनयुक्त पदार्थ सेवन करण्यासह सकारात्मक विचार ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची सर्वात जास्त जबाबदारी मुख्यता पोलीस प्रशासनावर आली आहे. सर्वच विभागांचा पुढाकार असला तरी आरोग्य, पोलीस प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. सलग वर्षभरापासून या दोन्ही विभागातील अधिकारी, कर्मचारी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या कामात व्यस्त आहेत. इतरांच्या आरोग्याची काळजी घेत असताना आरोग्य व पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही कोरोना बाधित व्हावे लागत आहे. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त ठेवणे, सण, उत्सव, दौऱ्यानिमित्त बंदोबस्त यामुळे पोलीस प्रशासनाची धावपळ वाढली आहे. अशाही स्थितीत कोरोनाच्या पहिल्या लाटेला परतवून लावले. या लाटेत ४१ पोलीस कर्मचाऱ्यांना कोराेनाबाधित व्हावे लागले. वर्षभरात पहिल्या लाटेत ४१ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाने गाठले होते. मात्र, दुसऱ्या लाटेत रोगप्रतिकारक शक्ती गमावणाऱ्या ६८ कर्मचाऱ्यांना कोरोनाबाधित व्हावे लागले.
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी रोज व्यायाम, फळांचे सेवन
कोरोनापासून बचाव करण्यासाठी पोलीस कर्मचारी विविध खेळ खेळणे, योगा, व्यायाम करण्याला प्राधान्य देत आहेत. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी आहारात फळे, प्रोटीनयुक्त पदार्थ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहावी, यासाठी नियमित पुरेसा व्यायाम, योगा करीत असतो. तसेच आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांसह सकारात्मक विचार करण्यावर भर देत आहे.
- आकाश पंडितकर, पोना, जिल्हा विशेष शाखा
रोग प्रतिकारक शक्ती चांगली राहावी, यासाठी नियमित योगा, प्राणायामवर भर दिला आहे. तसेच आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, प्रथिनेयुक्त पदार्थ घेत असल्याने दोन वर्षात एकदाही आजारी पडलो नाही.
- संतोष वाठोरे, पोह. हिंगोली ग्रामीण
रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी योगा, प्राणायाम, ध्यानाला महत्व दिले आहे. दररोज नित्यक्रम पाळत असून, यामुळे उत्साह वाढतो. तसेच आहारात हिरव्या पालेभाज्यांसह फळे घेत आहे.
- महेश यगडे, पोना
पहिली लाट
एकूण रुग्ण -
पोलीस - ४१
एकूण मृत्यू -
पोलीस मृत्यू - ००
दुसरी लाट
एकूण रुग्ण -
पोलीस - ६८
एकूण मृत्यू -
पोलीस मृत्यू - ०२