हिंगोली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत किडनीचे नुकसान अधिक प्रमाणात समोर येत आहे. किडनीच्या रुग्णांना त्रास होऊ लागल्यास फॅमिली डॉक्टरांना आजाराबाबत बोलून पुढील उपचार घ्यावेत, किडनी तज्ज्ञांशी बोलावे, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
गत दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले असले तरी सद्य:स्थितीत कोरोना महामारीची लाट ओसरु लागली आहे. किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास त्याने वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्याच्यावर इतर रुग्णांप्रमाणेच योग्य तो औषधोपचार केला जातो. वेदनाशामक गोळी त्यास देता येईल. ज्यांना रेमिडीसिविर द्यावे लागते त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. इतर कोरोना बाधितांप्रमाणे किडनीच्या रुग्णांनीही स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. किडनीच्या रुग्णाने त्रास होऊ लागल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास पुढील होणारे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात.
किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास...
किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास त्याच्यावर वेगळा काही उपचार केला जात नाही. जो औषधोपचार इतर कोरोना बाधितांवर केला जातो त्याच पद्धतीने योग्य तो उपचार किडनीच्या रुग्णावरही केला जातो. त्रास होऊ नये म्हणून वेदनाशक गोळीही घेण्यास सांगितली जाते.
फॅमिली डॉक्टरांशी बोलूनच घ्या स्टेरॉईड
किडनीच्या रुग्णाने फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेणे हितावह ठरणार आहे. वेदना होत असल्यास कोणतीही मेडीसीन मनाने घेऊ नये. स्टेरॉईड पण फॅमिली डॉक्टरांशी बोलूनच घ्यावे. त्यानंतर जवळच्या आरोग्य केंद्रावर जावून उपचार घ्यावेत व किडनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
हे करा...
किडनीच्या रुग्णास जास्त प्रमाणात वेदना होत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेदनानाशक गोळी घेता येईल. वेदना बरोबर ताप असेल तर तापीची गोळीही घेतल्यास योग्यच राहील.
हे करु नका...
किडनीच्या रुग्णाने खाजगी उपचार करणे योग्यच नाही. खाजगी उपचार केल्यास दुसराच त्रास उद्भवण्याची शक्यता असते. वेळीच किडनी तज्ज्ञ व फॅमिली डॉक्टरांचा सल्ला हा त्या रुग्णाला फायद्याचाच आहे.
किडनीचा त्रास लपवू नये
किडनी आजाराबाबत काही लक्षणे असल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांकडे गेल्यास किडनीचा त्रास होत आहे हे मात्र आवर्जुन सांगावे. म्हणजे त्या रुग्णावर योग्य तो उपचार करुन त्यास होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी औषधोपचार देता येईल.
- डॉ. संतोष दुरुगकर, नेफ्रोलॉजी विभाग प्रमुख, हिंगोली