हिंगोली: डिजिटल युगात एस. टी. महामंडळ पुढे जात असतानाच ‘इटीआयएम’ मशीन बंद पडू लागली आहे. त्यामुळे वाहकाला आता ‘जुने ते सोने’ म्हणण्याची वेळ आली आहे. गळ्यातील इलेक्ट्रॉनिक मशीन चालकाजवळ ठेवत तिकिटाचा ट्रे हातात घेऊन प्रवाशांसमोर जाऊन तिकिटाला पंच करावे लागत आहे. मशीन लवकर का दुरुस्त केली जात नाही, महामंडळाकडे पैसा नाही का, डिजिटल युगात एसटी महामंडळ ५० वर्षे मागे का जात आहे, स्पर्धेच्या युगात मागे जाणे म्हणजे महामंडळ परत मागे हटले, आदी प्रश्न उपस्थित होत आहेत. एवढेच काय प्रवासीही वाहकाकडे तिकिटाचा ट्रे आल्याचे पाहून केविलवाण्या नजरेने पाहत ‘साहेब’ तिकिटाची मशीन कुठे आहे, असेही म्हणायला मागेपुढे पाहत नाहीत. चालकाकडे चार्जिंगला मशीन ठेवली आहे, असे म्हणून वाहक वेळ निभावून नेत आहेत.
जिल्ह्यातील एकूण बस - १४५
सध्या सुरू असलेल्या बस - १२१
तिकीट काढण्याच्या एकूण इलेक्ट्रॉनिक मशीन - ३०५
सध्या बंद असलेल्या इलेक्ट्रॉनिक मशीन - १०४
काय म्हणते आकडेवारी
आगार इलेक्ट्रिक मशीन बिघाड ट्रेचा वापर
हिंगोली १२४ ५० १२४
वसमत ११६ ४२ ११६
कळमनुरी ६५ १२ ६५
दुष्काळात तेरावा महिना....
कधी नाही ते डिजिटल युगात वाहकांच्या गळ्यात इलेक्ट्रॉनिक मशीन आली होती. पण, आता ‘पहिले पाढे पंचावन्न’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. आधी कोरोनाने घरी बसविले होते. आता परत कामावर आले ना आले की, पंच हातात घेऊन तिकिटावर प्रेस करत बोटे दुखण्याची वेळ आली आहे. यालाच म्हणतात ना, ‘दुष्काळात १३ वा महिना.’
वाहकांची पुन्हा आकड्यांची जुळवाजुळव...
गत काही वर्षे सुखाची जात होती तोच आता आकड्यांची जुळवाजुळव करण्याची वेळ आली आहे. चालत्या बसमध्ये मांडीवर तिकिटाचा ट्रे ठेवून रुळींग कागदावर तिकिटांची मांडणी करत हिशेब करावा लागत आहे. असे दिवस पुन्हा येतील असे वाटले नव्हते. पण ते आज आले आहेत. यात दोष कुणाला द्यावा, हेही कळायला मार्ग नाही. विचारणा करावी तर कुणाकडे? हेही कळत नाही. चला ‘डिजिटल युगात हेही दिवस निघून जातील’ असे मनाशी पुटपुटत वाहक आकड्यांची जुळवाजुळव करताना बसमध्ये दिसून येत आहेत. एवढे मात्र खरे की, ज्यांच्याकडे मशीन दुरुस्तीचे काम दिले आहे त्यांनी वेळेत मशीन दुरुस्त करून देणे गरजेचे आहे. पण, हे दुरुस्तीचे काम का वेळेवर होत नाही?, हाही आकड्यांचा खेळ आहे का? असे म्हणायला वाव आहे.
पगार मिळतो हेच नशीब...
इलेक्ट्रॉनिक मशीन गळ्यात आल्यापासून बरेच काम हलके झाले होते. परत तिकिटांचा ट्रे हातात येईल, असे कधीच वाटले नव्हते. आजमितीस मशीन व ट्रे घेऊन फिरावे लागत आहे. मशीन दुरुस्तीसाठी पैसा लागतो आहे, हे कारण सांगून वाहकाला तिकिटांचा ट्रे दिला जात आहे. आमचे नशीब चांगले ते म्हणजे पगार तरी वेळेवर मिळतो आहे. त्यामुळे आम्ही एसटी महामंडळाला कधीही विसणार नाही.
- राजेश्वर शेंडे, वाहक
सर्वच ठिकाणी सध्या अडचण आहे. इतरांच्या मानाने आपली परिस्थिती चांगली आहे. ज्या मशीन नादुरुस्त आहेत, त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. सध्या स्पेअरपार्टची कमतरता असून ते पार्टस मागवून घेतले जातात. मशीन दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे.
- मुक्तेश्वर जोशी, विभागीय नियंत्रक, परभणी.