हिंगोलीत व्यवस्थापनाचा प्रतिसाद नसल्याने राष्ट्रवादीचा युवासंवाद बारगळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 02:24 PM2019-08-22T14:24:56+5:302019-08-22T14:25:08+5:30
आदर्श महाविद्यालयात युवासंवाद कार्यक्रमासाठी खा.अमोल कोल्हे गेली अन् तेथे त्यांना साधा सेवकही भेटला नाही.
हिंगोली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने युवकांशी संवाद साधण्यात येत आहे. मात्र हिंगोली येथे आदर्श महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमास व्यवस्थापनाने प्रतिसाद न दिल्याने हा कार्यक्रमच बारगळला.
हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्ते कमी अन् नेतेच जास्त अशी परिस्थिती आहे. याचा परिणाम नव्याने पक्षात दाखल झालेल्यांवरही अल्पावधीतच होतो. प्रत्येकजण नेत्याच्या तोऱ्यातच वावरतो. २१ रोजी रात्री हिंगोली मुक्कामी आलेल्या राकाँ नेत्यांनी २२ रोजी सकाळीच पक्षातील मंडळींची झाडाझडती घेतली. नेते अजित पवार यांनी राकाँ नगरसेवकांतील कुरबुरीची आपल्या खास शैलीत विचारणा केली. त्यावरून जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण व आ.रामराव वडकुते यांच्यातच जुंपली होती. मात्र पवारांनी दोघांचीही बोलती बंद करीत यापेक्षा संघटना बळकट करण्यासाठी काम करण्याचा सल्ला दिला.
विशेष म्हणजे अशा नगरसेवकांची नाराजी असेल तर ती दूर करण्यासाठी बोलावणे पाठवण्यास सांगूनही तसे काही कोणी प्रयत्न केले की नाही, हे कळाले नाही. यापैकी कोणीच तेथे हजर झाला नाही. त्यानंतर युवासंवाद कार्यक्रमाचे नियोजनच नसल्याने कधी विश्रामगृह तर कधी एखाद्या महाविद्यालयात हा कार्यक्रम घेण्यात येईल, असे सांगितले जात होते. शेवटी आदर्श महाविद्यालयात युवासंवाद कार्यक्रमासाठी खा.अमोल कोल्हे गेली अन् तेथे त्यांना साधा सेवकही भेटला नाही. प्राचार्यांच्या केबिनलाही कुलूपच होते. त्यामुळे या महाविद्यालयाला कोणी कळविले होते की नाही, असा प्रश्न होता. कोल्हे यांनी तेथून बाहेर पडण्यातच धन्यता मानली.
हिंगोली विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची मागणी केली जात आहे. मात्र येथेही काँग्रेसप्रमाणेच गट-तटांचे राजकारण फोफावत आहे. मग येथून काँग्रेस लढली काय अन् राष्ट्रवादी, फायदा होईल असे गणित मांडायचे कसे?