हिंगोली: जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत कोविशिल्ड व कोवॅक्सीन या दोन्ही लसींचे डोस १ लाख ९ हजार ५३ नागरिकांना देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रेमकुमार ठोंबरे यांनी दिली.
जिल्ह्यातील ३३ केंद्रांवर १६ जानेवारीपासून कोरोना लसींचे डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी कोविशिल्ड १ लाख ४० हजार ८०० तर कोव्हॅक्सीन ३० हजार ८८० डोस आलेले होते. आजमितीस जिल्ह्यात ११ हजार ८०० कोविशिल्ड तर २ हजार ५०० कोव्हॅक्सीन लसींचे डोस शिल्लक आहेत. जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील ३३ सरकारी आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुरु आहे.
आजपर्यंत झालेले लसीकरण...
लसीकरणामध्ये हेल्थकेअर ७ हजार ४३, फ्रंट लाईन वर्कर १२ हजार ८६१, १८ ते ४५ वयोगट ५ हजार ७४५, ४५ ते ६० वयोगट ३८ हजार ६९० तर ६० वर्षावरील ४४ हजार ६९० ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील ज्या केंद्रावर लसीकरण सुरु आहे, अशा ठिकाणी नागरिकांनी गोंधळ-गडबड न करता शांततेने लसीकरण करुन कोरोना महामारीपासून बचाव करुन घ्यावा. ज्यांनी अद्यापही लसीकरण केले नाही त्यांनी नजीकच्या आरोग्य केंद्रांमध्ये जावून लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.