हिंगोली : मराठा आरक्षणप्रश्नी जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून ठिकठिकाणी रास्तारोको, चक्काजाम आंदोलने करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने एसटी महामंडळाने १६ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील बससेवेला ब्रेक लागला आहे. परिणामी, हिंगोली, वसमत व कळमनुरी या तिन्ही आगारांतर्गत जवळपास दोन हजारांवर बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाला लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
जिल्ह्यात मराठा समाजबांधवांच्या वतीने आरक्षणासाठी राष्ट्रीय महामार्गांसह ग्रामीण भागातही ठिकठिकाणी रास्तारोको करण्यात येत आहे. आंदोलनादरम्यान १६ फेब्रुवारी रोजी वसमत आगाराची बस खांडेगावजवळ पेटविण्यात आली. तसेच, अन्य दोन बसवरही दगडफेकीची घटना घडली. त्यामुळे एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाकडून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बससेवा बंद ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार हिंगोली, वसमत व कळमनुरी या तिन्ही आगारांतर्गत एकही बस सोडली नाही. तर ज्या काही बस बाहेरगावी फेरीसाठी गेल्या होत्या. त्यांनाही जवळच्या आगारात थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या.
उत्पन्न आणि खर्चाची घडी बसविताना एसटी महामंडळाला एक प्रकारे तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत उत्पन्न बुडाले तरी चालेल; परंतु नुकसान नको म्हणून बससेवा थांबविण्यात आली आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांत जवळपास दोन हजारांवर बसफेऱ्या रद्द झाल्या असून, यात एसटी महामंडळाला लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
हिंगोली आगाराला २७ लाखांचा फटका...हिंगोली आगाराचे विनासवलत ५ लाख रुपयांचे उत्पन्न आहे, तर प्रवास भाड्यात सवलतीसहित जवळपास ९ लाखांचे उत्पन्न मिळते. परंतु, मागील तीन दिवसांपासून बससेवा ठप्प असल्यामुळे आगाराला सुमारे २५ ते २७ लाख रुपयांचा फटका बसला आहे. तर दुसरीकडे प्रवाशांचीही तारांबळ उडत असल्याचे पाहावयास मिळत आहे.