हिंगोली: मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत वसमत तालुक्यातील महमदपूरवाडी गावात कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी गावात येता कामा नये, असा फलक गावाच्या वेशीवर लावला आहे. पुढारी मंडळींनी गावात न येता मंत्रालयात जावून आवाज उठवावा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे. तरच गावात प्रवेश करावा. या गावात एकही मराठा समाजाचे कुटुंब राहत नाही. परंतु त्यांची ७० वर्षापासूनची वेदना लक्षात घेऊन या गावातील लिंगायत समाजाने पुढाऱ्यांसाठी गावबंदीचा एकमुखी निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वस्तरामधून आंदोलन उभारण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्व गाव एकवटला आहे. या गावात कानडी (लिंगायत) समाजाचे लोक राहत आहेत. या गावातील ग्रामस्थांनी एकमताने २७ आक्टोबर रोजी ठराव केला. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून गाव एकवटला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत गावात एकही राजकीय पक्षाच्या नेत्याला प्रवेश मिळणार नसल्याचे गावकऱ्यांनी जाहीर केले आहे. पुढाऱ्यांना गाव बंदी असल्याचे फलक गाव सीमेवर लावले आहेत. महमदपूरवाडी गावाने मराठा बांधवांच्या वेदना जाणून घेतल्या आहेत. ७० वर्षांपासून आरक्षण देवू असे आश्वासन दिले आहे. पण ते पूर्ण केले नाही असे गावकरी सांगत आहेत.
बोराळा ग्रामस्थांचाही निवडणुकांवर बहिष्कार...वसमत तालुक्यातील बोराळा येथेही आरक्षण लढ्याला पाठिंबा आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय पक्ष, पुढाऱ्यांना गावबंदीचा ठराव घेण्यात आला आहे. एवढेच काय सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. येथील श्री संकट मोचन हनुमान मंदिरासमोर समस्त ग्रामस्थांनी एकत्र येत शपथ घेतली आहे. आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावात प्रवेश देणार नसल्याचे फलक लावले आहे.