हिंगोलीचे आ. तान्हाजी मुटकुळे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ग्रामपंचायतीपासून केली आहे. ते पहिल्यांदा १९९५ साली ग्रा.पं.त सदस्य झाले. मात्र त्यांना सरपंच होता आले नाही. पुढे १९९६ ला त्यांनी जि.प.त नशीब आजमावले. निवडून आले. १९९७ ला शिक्षण व अर्थ सभापतीपदाची धुराही सांभाळली. त्यानंतर २००६ ला पुन्हा जि.प. सदस्य झाले. २००९ मध्ये विधानसभेच्या रिंगणात उतरले. मात्र पराभव पत्करावा लागला. २०१४ मध्ये मात्र मोठ्या फरकाने बाजी मारली. २०१९ ला आपला गड राखण्यात ते यशस्वी ठरले.
वसमतचे राजू पाटील नवघरे यांनीही २००५ मध्ये बाभूळगावचा सरपंच होत राजकीय कारकीर्द सुरू केली. सर्वांत कमी वयाच्या सरपंच म्हणून परिसरात ख्याती मिळविली. दहा वर्षे गावात कारभारी राहिले. पुढे बाजार समितीत सभापती झाले. शिवाय जि.प.तही त्यांच्या मातोश्री निवडून आल्या होत्या. २०१९ च्या विधानसभेसाठी त्यांनी तरुणाईच्या बळावर तयारी चालविली होती. त्यातच पक्षानेही त्यांना संधी दिली. यामुळे त्यांनी या निवडणुकीत बाजी मारली. त्यांनीही ग्रा.पं.तूनच राजकीय श्रीगणेशा केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांतूनच नेतृत्व !
ग्रामपंचायतीतूनच नव्हे, जि.प., पं.स. न.प. या स्थानिक स्वराज्य संस्थांतूनही अनेक जणांनी पुढे आपली राजकीय कारकीर्द घडविली. हिंगोलीत असे अनेक आजी-माजी आमदार व खासदार आहेत. ज्यांनी यात ठसा उमटविला होता.
खा. हेमंत पाटील यांनी नांदेड महापालिकेत नगरसेवक म्हणून काम पाहिले. राज्यसभा खासदार राजीव सातव यांनीही पं.स. सदस्य, जि.प. सभापती म्हणून काम पाहिलेले आहे. तर आ. संतोष बांगर हेही हिंगोलीत नगरसेवक होते. माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, साहेबराव पाटील यांनीही जिल्हा परिषदेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला होता.
ही तर राजकीय पायाभरणी
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये थेट जनतेशी नाळ जुळते. ग्रामीण असो वा शहरी भागातील ठरावीक भागाचे प्रतिनिधित्व करून अनुभव घेता येतो. विकासही साधता येतो. त्यातूनच नेतृत्व घडत असते. त्यामुळे अनेक तरुण आपल्या राजकीय कारकिर्दीची पायाभरणी करण्यासाठी या निवडणुकांकडे पाहतात. यंदाही अनेक तरुणांनी तसेच नेत्यांच्या मुलांनी राजकारणात पाऊल टाकल्याचे दिसत आहे.