हिंगोली : कोरोनाचेे रुग्ण जिल्ह्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. ऑक्सिजनची व्यवस्था तर सोडा, साधे जनरेटरही नाही. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोरोना रुग्णांना घामाघूम होण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमान वाढत चालले आहे. अशा तापमानात कोरोना केअर सेंटरवर लक्ष द्यायला पाहिजे; परंतु कोणीही लक्ष देत नाही, अशी तक्रार कोरोना रुग्णांची आहे. जिल्ह्यात १० कोरोना केअर सेंटर आहेत. लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटर हे गैरसोयीचे ज्वलंत उदाहरण असून सेंटरमध्ये जागोजागी कचरा साचलेला पहायला मिळत आहे. सद्य:स्थितीत ऊन प्रखर झाले असून लिंबाळा कोरोना केअर सेंटमधील रुग्णांना आत वीजपुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे उकाड्याचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर दुर्गंधीलाही सामोरे जावे लागत आहे. रुग्णांच्या खोलीसमोर कचऱ्याचे बकेट ठेवले आहे. सध्या ठेवलेले बकेट हे कचऱ्याने भरून गेले असून सर्वत्र कचरा पसरला आहे. काही रुग्ण पायाने कचरा ढकलत आहेत. कचरा उचलण्याबाबत अनेक वेळा रुग्णांनी डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना सांगितले; परंतु अद्याप तरी कचरा उचलला गेला नाही. कोरोना केअर सेंटरच्या सर्वच खोलींच्या काचा फुटल्या आहेत. रात्रीच्यावेळी डासांचे प्रमाण भरपूर असल्यामुळे रुग्णांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याचबरोबर शौचालयाचीही दुरवस्था झाली असून कोरोना केअर सेंटर झाल्यापासून येथील शौचालय साफ केले नसल्याचे रुग्णांनी सांगितले. कोरोना केअर सेंटरची इमारत जुनी असल्याने येथे मधमाशांनी पोळे तयार केले असून हे आग्या मोहोळ असल्याचे सांगितले. तीन-चार दिवसांपूर्वी एका मधमाशीने रुग्णाला चावाही घेतल्याचे सांगण्यात आले. डॉक्टर मंडळींबरोबरच शिवभोजन डबेवालेही गेटवरूनच आवाज देतात. त्यामुळे अनेकवेळा कोरोना रुग्णांना उपाशीच राहण्याची वेळ येते.
एप्रिल महिना तापला
फेब्रुवारी व मार्च महिना कसा तरी रुग्णांनी कोरोना केअर सेंटरवर काढला. आता एप्रिल महिनाही तापला आहे. पाच दिवस एप्रिल महिन्याचे शिल्लक राहिले आहेत. मे महिना बाकी असून सेंटरवर वीजपुरवठ्याची व्यवस्था केली नाही, तर रुग्णांना दुसऱ्यास आजाराला सामोरे जावे लागणार आहे. जे कोणी संबंधित डॉक्टर आहेत त्यांंनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
प्रतिक्रिया
कोरोनापेक्षा उकाड्याचाच त्रास
सेंटरवर पंखे आहेत. मात्र, दुपारनंतर चांगलाच उकाडा जाणवतो. उकाड्यामुळे त्रासही होतो. आता पाच-सहा दिवस बाकी राहिले आहेत. कुठे ओरड करीत बसणार.
-विशाल सोनटक्के
कोरोनाचा काही त्रास नाही. मात्र, उकाडा सहन होत नाही. सायंकाळी पाच वाजेनंतर आम्ही सर्व रुग्ण खोलीच्या बाहेर येऊन बसत असतो. तक्रार करावी तर कुणाकडे हाही मोठा यक्षप्रश्न आहे.
-राजू आमटे