- विश्वास साळुंकेवारंगा फाटा (जि. हिंगोली) : सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याप्रमाणे पोलिस नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असतात. याचीच प्रचिती हिंगोली जिल्ह्यात आली. पोलिसांनी तत्परता दाखवत वारंगा फाटा येथील एका व्यापाऱ्याचे १ लाख रुपये त्याला परत मिळवून दिले.
वारंगा फाटा येथील भंगाराचा व्यवसाय करणारे व्यापारी शेख निजाम शेख खदीरसाब हे दररोज व्यवसायाच्या निमित्ताने नांदेड ते वारंगा फाटा अशी ये-जा करतात. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे नांदेड ते अकोला एसटी बसमध्ये बसले. त्यावेळी त्यांनी लगेज कॅरिअरवर एक लाख रुपये असलेली बॅग ठेवली. त्याच ठिकाणी दुसरी एक बॅग होती. वारंगा फाटा येथे उतरताना त्यांनी पैशाची बॅग घेण्याऐवजी दुसरी बॅग घेतली. यानंतर थोड्या वेळाने त्यांना बॅग बसमध्ये विसरल्याचे लक्षात आले आणि त्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली.
मेहनतीचे पैसे आले पदरात...माहिती मिळताच पोलिसांनी लागलीच तपास सुरू केला. पोलिसांनी आखाडा बाळापूर बसस्थानकात सदरील एसटी बसमध्ये जाऊन बघितले. त्यावेळी बॅग पोलिसांना आढळून आली. यानंतर पैशाची बॅग उपविभागीय पोलिस अधिकारी संदीपान शेळके, सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार यांच्या हस्ते शेख निजाम यांच्यााकडे सुपूर्द करण्यात आली.