लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे कुष्ठरोग शोधमोहीम अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यातएकूण ६८ जणांना कुष्ठरोग असून या रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.कुष्ठरोग शोध अभियान २०१८-१९ अंतर्गत सध्या आरोग्य विभागातर्फे त्वचारोग तपासणी मोहीम राबविली जात आहे. सदर मोहिमेमध्ये गाव पातळीवरील कुटुंबातील सदस्यांची आरोग्य विभागाच्या टीमद्वारे त्वचारोग तपासणी सुरू असल्याची माहिती डॉ. राहुल गिते यांनी दिली. तसेच कुष्ठरोग व त्वचेचे इतर आजाराचे लवकर निदान करून उपचार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्वचारोग तपासणी मोहिमेसाठी गावपातळीवर सूक्ष्म नियोजन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आशा स्वयंसेविका व पुरूष स्वयंसेवक यांच्या टीमद्वारे दरदिवशी २० घरांतील व्यक्तीची तपासणी केली जाणार आहे.तपासणीदरम्यान आढळून आलेल्या संशयित रूग्णांना औषधोपचार दिले जाणार आहेत. २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर विशेष मोहीम राबवून कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. शिवाय त्वचारोगाविषयी शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढून जनजागृती केली जाणार असल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.सदर मोहीम यशस्वीपणे राबविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अनिल भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने कुष्ठरोग शोध मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
‘कुष्ठरोग शोधमोहीम अभियान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 1:01 AM