रमेश कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : सर्वांना सक्तीचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासन आदेश असला तरी प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी वेगळे चित्र पहावयास मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यात तर ३० शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. यामध्ये सर्वाधिक शाळांची संख्या कळमनुरी तालुक्यात असून १३ शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.शासनाच्या धोरणानुसार सक्तीचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे बंधनकारक आहे. त्याच बरोबर शाळांसाठीच्या भौतिक सुविधाही उपलब्ध करून देण्याचे शासन आदेश असले तरी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागा नसल्याचे चित्र कळमनुरी तालुक्यात व जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. शासनाकडे नोंद झालेल्या युडायसनुसार जिल्ह्यात तब्बल ३० शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे. अशा सर्वांत जास्त शाळा कळमनुरी तालुक्यात असून, हिंगोली आणि सेनगाव या तालुक्यांमध्ये सर्वांत कमी म्हणजे २-२ शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या नोंदवली गेली आहे. हिंगोली तालुक्यातील वसपांगरा या शाळेत विद्यार्थीसंख्या ६ आहे. तर शिक्षक मात्र दोन आहेत. जुमडा येथील शाळेत विद्यार्थी ७ तर शिक्षक २ आहेत. तर सेनगाव तालुक्यातील गोटवाडी व हत्तावाडी या शाळांमध्ये ८ आणि ९ अशी विद्यार्थी तर २-२ शिक्षकांची नियुक्ती आहे. वसमत तालुक्यात खाजमापूर, हनुमान नगर, कारेगाववाडी (कुरूंदा), विकास नगर, दत्तनगर (कुरूंदा), चिंचोली या ६ शाळांचा समावेश आहे. तर कळमनुरी तालुुक्यातील जुनूना वस्ती, पाणवाडी, वस्तीशाळा खडकद खु., एक घरी, रंगनाथवाडी, गणेशवाडी (दांडेगाव), जामगव्हाण तांडा, बेलमंडळ वसाहत, कुंभारवाडी, येहळेगाव गवळी, टाकळगव्हाण, सोनुलेवस्ती रामवाडी, पाणबुडीवस्ती या १३ शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थीसंख्या आहे. तर औंढा तालुक्यातील कामठा, वडद, नागेश दत्तवाडी, सिद्धेश्वर तांडा, देववाडी, नागझरी तांडा, म्हाळसगाव या ७ शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थीसंख्या आहे. या प्रत्येक शाळांमध्ये २-२ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. १० पेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांची यादीच शिक्षण विभागात चर्चेचा विषय बनली आहे. हिंगोली तालुका २, सेनगाव तालुका २, वसमत तालुका ६, कळमनुरी तालुका १३, औंढा तालुका ७ अशा एकूण ३० शाळांची विद्यार्थीसंख्या १० पेक्षा कमी आहे. हा पट वाढविण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचे शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले आहे. हा पट जर चार वर्षे कायम राहीला तर शाळा बंद करण्याबाबतचा निर्णय होवू शकतो. ३ कि.मी. अंतरापर्यंत एक प्राथमिक शाळा असली पाहिजे. या नियमानंतर्गत या शाळा उभारल्या आहेत. प्राथमिक शिक्षण सक्तीच व गुणवत्तापूर्ण देण्याची सूचना असली तरीही १० पेक्षा पटसंख्या कमी असलेल्या शाळेत कोणती गुणवत्ता जोपासली जाते, हा संशोधनाचा विषय आहे.विद्यार्थीसंख्या भरपूर असताना तेथे शिक्षकांची संख्या प्रमाणात नाही. अनेक ठिकाणी ५ वर्ग आणि २ शिक्षक अशी अवस्था आहे; परंतु १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या प्रत्येकी २ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याकडे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून प्रत्यक्षात खरेच या शाळांमध्ये शिकवणी होते काय? याची तपासणी करायला हवी, असेही शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.एकीकडे विद्यार्थी संख्या भरपूर असतानाही अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. परंतु जिल्ह्यातील या ३० शांळामध्ये मात्र दहा पेक्षा कमी विद्यार्थी असतांनाही प्रत्येक शाळेत मात्र दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कमी विद्यार्थी असतांनाही हे शिक्षक तेथे काय काम करतात.याचेवरिष्ठ अधिकाºयांकडून परिक्षण होत नाही त्यामुळे जेथे गरज आहे तेथे शिक्षक नाहीत. अशी विषम परिस्थीती हिंगोली जिल्ह्यात निर्माण झाली आहे. याकडे शिक्षण विभाग कधी लक्ष देणार आहे. विचारणा आता नागरीक करीत आहेत.‘यु डायस’ नुसार आता विद्यार्थी संख्या शासनापर्यंत नियमीत पोहचत असते. त्यांच्या सूविधा व निर्णय हे शासन या संख्येनुसारच पाठवीत असतो. जिल्ह्यात तीस शाळांमध्ये दहा पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे परंतु यासंबंधी काय कारवाई करावी याबाबतचे निर्देष शासनाकडून प्राप्त झालेले नाहीत. असे प्रभारी शिक्षणाधिकारी गणेश शिंदे म्हणाले.
जिल्ह्यातील ३० शाळांत १० पेक्षा कमी विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 1:20 AM