हिंगोली : कोरानाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. असे असले तरी पेट्रोलची दरवाढ मात्र कमी होत नसल्याचे दिसत आहे. महिनाभरात तब्बल पाच ते सहा वेळेस दरवाढ झाली असून, पेट्रोलने शंभरीत प्रवेश केला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. ते ठप्प असतानाही पेट्रोल दरवाढ थांबण्याचे नाव घेत नाही. सध्या हिंगोली शहरात पेट्रोल ९९ रुपये ६६ पैसे प्रतिलिटर दराने विक्री होत आहे. त्यातही ग्रामीण व शहरी भागांत पेट्रोलच्या किमतीतही काही पैशांची तफावत आढळून येत आहे. याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. कोरोनाच्या काळात अनेकांनी दुचाकीवर व्यवसाय थाटले होते. आता पेट्रोलच शंभरीत पोहोचल्याने व्यवसाय करावा तरी कसा, असा प्रश्न व्यावसायिकांना पडत आहे. २०११ मध्ये ६१ रुपये ७३ रुपये प्रतिलिटर दराने मिळणारे पेट्रोल आता ९९ रुपये ६६ पैशांनी खरेदी करावे लागत आहे.
तेलाच्या किमतीपेक्षा टॅक्स जास्त
पेट्रोलवर कोणताही स्थानिक कर लावला जात नाही. मात्र केंद्र व राज्य शासनाकडून आकारल्या जाणाऱ्या भरमसाट करांमुळे पेट्रोलची मूळ किमतीपेक्षा अधिक पटींनी विक्री होत आहे. एक लिटर पेट्रोलची किंमत ३८ रुपये १० पैसे आहे. त्यात एक्साईज ड्यूटी ३२ रुपये ९८ पैसे, राज्य शासनाचा टॅक्स २६ रुपये २६ पैसे, डीलरचे कमिशन ३ रुपये ४१ पैसे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने पेट्रोलवरील कर कमी केल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकेल.
पुन्हा सायकलवरून फिरावे लागणार
पेट्रोल शंभर रुपये दराने खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे दुचाकी वाहने बाळगणे अवघड बनले आहे. पेट्रोलच्या दरवाढीमुळे पुन्हा सायकल खरेदी करावी लागणार असल्याचे दिसत आहे.
- रवी मुदीराज, हिंगोली
पेट्रोलसह डिझेलच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता कुठे सर्वसामान्यांकडे दुचाकी वाहने आली होती. त्यात पेट्रोल दरवाढीमुळे घेतलेली वाहने विक्री करायची वेळ आली आहे. पेट्रोल दरवाढीमुळे सायकल खरेदी करण्याचा बेत आखला आहे.
- नितीन गोरे, हिंगोली
- पेट्रोल दरवाढीमुळे दुचाकीवर व्यवसाय करणाऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. विक्रीतून आलेले पैसे पेट्रोलमध्ये जात आहेत. त्यामुळे घेतलेली दुचाकी विक्रीला काढावी लागत आहे.
- दीपक धुळे