वसमत (जि. हिंगोली) : घोट-घोट पाण्यासाठी वानरांच्या टोळ्या सैरावैरा फिरत आहेत. याच शोधातून वसमत तालुक्यातील दारेफळ येथे वानराच्या एका पिलाचे डोके तांब्यात अडकले. दोन दिवस तो याच अवस्थेत फिरला. त्याच्या जीवावर बेतणार असल्याने ग्रामस्थांनी वनविभाग व प्राणिमित्राच्या साह्याने मोठ्या प्रयत्नानंतर त्याची सुटका केली.
दुष्काळामुळे यंदा वसमत तालुक्यात पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहेत. माणसांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. तेथे वन्यप्राण्यांची अवस्था तर फार वाईट आहे. जंगल, शेतशिवारात फिरूनही पाणी मिळत नसल्याने वानरे गावात येत आहेत. वानरांच्या टोळीतील एका पिल्लाने दारेफळ येथे तांब्याच्या तळाला असलेले घोटभर पाणी पिण्यासाठी त्यात तोंड घातले. मात्र नंतर ते तांब्यात अडकून पडले. त्याच्या मातेने तांब्या काढायचा प्रयत्न केला. मात्र प्रयत्न निष्फळ ठरत होते. ती पिलापाशी कुणाला जाऊही देत नव्हती. तोंड अडकल्याने पिलाचे अन्न-पाणी बंद पडले अन् उपाशीपोटी त्याच्या चित्कारण्याने ग्रामस्थांची झोप उडाली. अखेर काही जणांनी वनविभागाशी संपर्क साधला.
बुधवारी वन विभागाचे बीट गार्ड अंगद एनले, व्ही.एन.बुच्चाले, वसमत येथील वन परिक्षेत्र अधिकारी कच्छवे हे प्राणीमित्र विकी दयाळ यांच्यासह पोहोचले. यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने पिलास आईपासून विभक्त करून त्यास पकडले. चार तासांच्या प्रयत्नानंतर ग्रामस्थ, वन विभागाचे कर्मचारी आणि प्राणिमित्राच्या सहकाऱ्याने त्या पिलाची अडकलेल्या तांब्यापासून मुक्तता करण्यात आली.
उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाण्यात शोधार्थ वानरे व जंगली प्राणी गावाकडे येत आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जंगलात प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणवठे तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. - जयसिंग कछवे, वनपरिक्षेत्र अधिकारी
पहा व्हिडिओ :