हयातनगर (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील पळशी येथे झालेल्या खून प्रकरणातील एका आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून इतर चौघांना भोगलेल्या शिक्षेसह प्रत्येकी तीन हजारांचा दंड ठोठावला आहे.
पळशी शिवारात शेतीच्या वादातून ९ जानेवारी २0१५ रोजी दुपारी गोविंद रामकिशन डांगरे, रमेश किशनराव डांगरे, कविता रमेश डांगरे, कुशीवर्ता रामकिशन डांगरे यांनी गोपाळ शिवाजी डांगरे, दादाराव डांगरे आदींना लाठ्या-काठ्या, चाकूने मारहाण केली होती. यात गोपाळचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपास फौजदार मो.जमील खाजा हुसेन यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा सत्र न्यायाधीश एम.बी.लंबे यांच्या न्यायालयात हे प्रकरण चालले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने गोविंद राकिशन डांगरे यांना कलम ३0२ अन्वये जन्मठेप व पाच हजारांचा दंड, कलम ३0७ अन्वये ५ वर्षे तुरुंगवास व ५ हजार रुपये दंड, कलम ३२६ अन्वये ३ वर्षे तुरुंगवास व ३ हजार दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ६ महिने शिक्षा भोगावी लागणार आहे. तर रमेश डांगरे, रामकिशन डांगरे, कविता डांगरे व कुशीवर्ता डांगरे यांना विविध कलमान्वये त्यांनी भोगलेली शिक्षा व प्रत्येकी ३ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दहा दिवसांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. नितीन नायक, अॅड. एस.डी कुटे अॅड.एस.के.दासरे, अॅड. नंदकुमार काकाणी आदींनी काम पाहिले.