लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातील ई-पास उपकरणांमधील शपथ पत्राद्वारे आधार व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करून आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढविण्यात येत आहे. दिनांक ३१ जानेवारीपूर्वी प्रत्येक शिधापत्रिकेत लाभार्थ्याचा किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिडींग करण्याच्या उद्देशाने जिल्हाभरात मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार यांनी दिली.
औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयामध्ये गुरुवार, ७ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता औंढा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या बैठकीला तहसीलदार कृष्णा कानगुले, नायब तहसीलदार सचिन जोशी, वैजनाथ भालेराव, अमोल घुगे, मुजीब पठाण, शंभुनाथ दुबळकर यांच्यासह तांत्रिक अधिकारी उपस्थित होते. जानेवारी २०२१चे धान्यवाटप करतेवेळी ई - पास उपकरणांद्वारे स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत कुटुंबातील सदस्यांचे आधार सिडींग नसल्यास अशा सदस्यांनी आधार व मोबाईल क्रमांकाचे नजीकच्या स्वस्त धान्य दुकानदारांकडे जाऊन सिडींग पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन संगेवार यांनी केले. दिनांक ३१ जानेवारीपर्यंत आधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्यांचे अनुज्ञेय धान्य पुढील महिन्यापासून आधार सिडींग होईपर्यंत निलंबित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लाभार्थी अन्न-धान्यापासून वंचित राहू नये, यासाठी ३१ जानेवारीपूर्वी आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक सिडींग करण्याचे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला औंढा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.
सलग तीन महिने धान्य उचलण्यात न आलेल्या सर्व शिधापत्रिका जानेवारी २०२१नंतर चौकशीअंती कायमस्वरूपी निलंबित करण्यात येतील. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना व एपीएल शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक स्वस्त धान्य दुकानदारांकडे जमा करून आधार सिडींग व मोबाईल सिडींग ३१ जानेवारीपूर्वी पूर्ण करावे.
अरुणा संगेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली. फाेटाे नं १०